पंचवटी पोलिसांकडून मद्यपींचे अड्डे उद्ध्वस्त!

आडगाव नाका ते बळी मंदिरदरम्यान टपर्‍यांवर जेसीबी

पंचवटी : प्रतिनिधी
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पंचवटी पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘साफसफाई’ मोहिमेत दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि.9) नवीन आडगाव नाका, विजयनगर चौफुली, मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी, अमृतधाम चौक ते बळी मंदिर सर्व्हिस रोडपर्यंत जेसीबीचा पंजा चालवण्यात आला. या मोहिमेत टवाळखोर व गुन्हेगारांची आश्रयस्थाने असलेल्या तसेच अमली पदार्थ विक्रीच्या टपर्‍या, खाद्यपदार्थांच्या गाड्या आदी काढण्यात आल्या आहेत.
पंचवटी पोलिसांनी बुधवारपासून गुन्हेगार व टवाळखोरांचे अड्डे असणार्‍या अतिक्रमणाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी आरटीओ ते मखमलाबाद लिंकरोडवरील बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे, बेकायदेशीर अतिक्रमण, चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याने नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले होते. या मोहिमेचा दुसरा टप्पा नवीन आडगाव नाका, विजयनगर चौफुली, मीनाताई ठाकरे स्टेडियम, अमृतधाम चौक ते बळीमंदिर सर्व्हिस रोड, हिरावाडी आदी परिसरात राबवण्यात आला. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे सुनील पवार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, गुन्हे शोध पथक व अधिकारी व कर्मचारी, महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील अतिक्रमण अधिकारी प्रवीण मोरे, अतिक्रमण कनिष्ठ लिपिक मिलिंद जाधव, टीमप्रमुख उमेश खैरे, नीलेश काळे, राजू साळुंखे, नंदू खांडरे, दत्ता आहेर, जिभाऊ गरुड आदी कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस व महापालिका यांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारीला पाठबळ देणार्‍या राजकीय पदाधिकारी हतबल झाल्याचे बोलले
जात आहे.

नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा!

गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांच्या या धडक कारवाईने नागरिकांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. जे नागरिक कारवाई करताना बघत आहेत, ते कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना भेटून अशा पद्धतीची कारवाई केल्याबद्दल आभार मानत आहेत. तसेच शहरातील इतरही भागात अशाच पद्धतीची कारवाई करावी, अशी मागणी करताना दिसत आहेत. कारवाईची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून, यात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आडगाव, म्हसरूळचे काय?

विशेष म्हणजे, केवळ पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बुधवारपासून कारवाई सुरू आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या आडगाव आणि म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. या परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या, पार्सल पॉइंटच्या नावाखाली चालवली जाणारी हॉटेल्स, शेड ही गुन्हेगार व अवैध धंद्यांची आश्रयस्थाने आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *