सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भक्त एकवटतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला वारकरी प्रेमाने विठुमाउली म्हणतात. आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर पांडुरंग पंढरपुरात युगोनुयुगे अविरतपणे उभा आहे. भक्तांच्या हाकेला ओ देणारी आबालवृद्धांची ही माउली कधी भक्तांच्या घरी पाणी भरते, कधी त्यांचे दळण दळून देते, कधी त्यांच्या सासू-सासर्‍यांची सेवा करते, तर कधी त्यांच्या घरी चाकरीही करते. भक्तांच्या अधीन असलेली ही माउली आणि तिची वारकरी लेकरे ही महाराष्ट्रातील आगळेवेगळे नाते आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातही माउलीचे लाखो भक्त आहेत. कार्तिकी एकादशीला ते न चुकता पंढरपुरात येतात. पुंडलिकाच्या वेळी पंढरपूरला स्थापन झालेली पांडुरंगाची ही मूर्ती पुढे कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने त्याच्या साम्राज्यात नेली. त्याने त्या मूर्तीची तुंगभद्रेच्या तीरावर स्थापना केली. त्या काळी महाराष्ट्रातील पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे आजोबा संत भानुदास हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. एकदा विठ्ठलाने प्रसन्न होऊन त्यांना दृष्टान्त दिला आणि ‘मी कर्नाटकात आहे. तू मला पंढरपुरात नेऊन माझी स्थापना कर’, असे सांगितले. विठ्ठलाने सांगितल्याप्रमाणे संत भानुदास यांनी विजयनगरच्या राजाकडे जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीची मागणी केली. राजालाही दृष्टान्त झाला होता. त्यामुळे संत भानुदासांचे विठ्ठलप्रेम आणि भक्ती पाहून राजाने ती मूर्ती त्यांना दिली. संत भानुदासांनी ती मूर्ती पंढरपूरला आणून तिची प्रतिष्ठापना केली. पांडुरंग हा शैव आणि वैष्णव दोघांचाही देव आहे. याला शैव आणि वैष्णव दोघेही भजतात. शैवपंथीय पांडुरंगाला ‘वीरभद्र’ म्हणजेच ‘विठ्ठल’ म्हणतात, तर वैष्णव त्याला ‘गोपाळकृष्ण’ असे म्हणतात. तो विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. म्हणूनच तो ‘हरिहर’ आहे.
असा हा पांडुरंग श्रीकृष्णाचाच अवतार आहे. काही जण ‘विठ्ठल हा भगवंताचा नववा अवतार बुद्ध आहे’, असेही म्हणतात. जैन विठ्ठलाला ‘तो बाविसावा तीर्थंकर नेमीनाथ आहे’, असे मानतात. नेमीनाथ आणि कृष्ण हे दोघेही गोपाळच होते. ते यदुकुलोत्पन्नच होते. नेमीनाथ हाही विठ्ठलासारखा वर्णाने सावळा होता. नेमीनाथांचे शंख हे चिन्ह विठ्ठलानेही धारण केले आहे. त्यामुळे या सर्व लक्षणांवरून ‘विठ्ठल हा दिगंबर नेमीनाथ असावा’, असे जैनांचे मत आहे. दक्षिणेला हाच गोपाल ‘श्रीव्यंकटेश ऊर्फ तिरुपती बालाजी’ म्हणून प्रसिद्ध आहे. कारण व्यंकटेशाची पत्नी पद्मावती आहे, तर विठ्ठलाच्या पत्नीचेही नाव पद्मावती (पदुबाई) आहे.
व्यंकटेशाची पत्नी पद्मावती त्याच्यावर रुसून तिरुयानूर येथे चिंचेच्या वनात राहायला गेली, तर विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी ही दिंडीर वनात (चिंचेच्या वनात) जाऊन बसली होती. विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हणतात, तसेच व्यंकटेशालाही कर्नाटकातील पर्वताच्या स्थलनामावरून ‘वेंगडम्’ असे म्हणतात. त्यामुळेच त्याला ‘विठ्ठलेश्वर अथवा व्यंकटेश’ असेही म्हणतात. कुरूबा आणि धनगर यांचा देव एकरूप होऊन त्यातून ‘विठोबा’ निर्माण झाला. शिला प्रतिमेतून ही जी सांगोपांग मूर्ती घडली, ती मात्र या दोन्ही जमातींनी शतकानुशतके त्याच रूपात जपून ठेवली असली पाहिजे. म्हणूनच विठ्ठल आणि तिरुपती या दोन्ही मूर्तींत पुष्कळ साम्य आढळते. पंढरीचा विठोबा दोन्ही हात कटीवर ठेवून उभा आहे, तर कर्नाटकात तो एक हात कटीवर आणि दुसरा हात वरद मुद्रेत असलेला अशा स्वरूपात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळेच संतांनी ‘सावळा हो विठ्ठलु कर्नाटकु’, असे त्याचे वर्णन केले आहे. संतांनी त्याला ‘कानडा’ म्हणूनही हाक मारली आहे. चैतन्याची ज्या अनुसंधानातून आराधना केली जाते, त्या स्वरूपात ते प्रगट होते. ज्याचा जसा भक्तिभाव असेल, तशी त्याला देव अनुभूती देतो.
बंगालमधील कोलकाता येथील कोळ्यांच्या राणीने दक्षिणेश्वरी देवीची स्थापना केली होती. त्या देवळात तिने श्रीरामकृष्ण परमहंस यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या भक्तिभावामुळे देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना दर्शन दिले. अनेकांना वाटते, ‘दगडात देव असतो का?’; परंतु ‘भक्तिभावाने दगडालाही पाझर फुटतो’, हे ध्यानात घ्यायला हवे. पांडुरंग हे सामान्यांचे दैवत आहे. पांडुरंगाचा रंग सावळा आहे आणि कृष्णही सावळाच आहे. काळा रंग हा अद्वैताचा आहे. वृंदावनातील गोपी कृष्णाला म्हणत, “अरे कृष्णा, तू अमावास्येला अंगावर काळी घोंगडी घेऊन यमुनाकाठी कदंब वृक्षावर बसलास की, तू आम्हाला दिसतच नाहीस. कारण रात्र काळी, यमुना काळी, तू काळा आणि घोंगडीही काळीच! अशा वेळी हे सर्व अद्वैत होऊन जाते.” संत ज्ञानदेव म्हणतात, ‘तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।’ म्हणजेच तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. त्याचे सगुण स्वरूप हे निर्गुणच आहे. तो स्वच्छ म्हणजे निर्मळ आहे. त्याची इंद्रिये विकाररहित आणि स्वच्छ आहेत. तो आत-बाहेर स्वच्छ आहे. म्हणून तो ‘पांडुरंग’ आहे.
एकदा लहानपणी संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई खेळत असताना मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली, “अरे दादा, तू या पांडुरंगाला निर्गुण म्हणतोस; परंतु हा तर सगुण स्वरूपात येथे कटीवर हात ठेवून उभा आहे. त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “मुक्ता, मी तुला गुरुमुखातून सांगतो. अगं, हा निर्गुणी बुंद (बिंदू) सगुणी उतरला आहे.” एकूणच हा निर्गुणच सगुण स्वरूपात इथे दिसत आहे. तो कष्टकरी, शेतकरी, सामान्यजन आणि अनाथ यांचा कैवारी आहे. म्हणून तो (उन्हात कष्ट करून रापलेला असा) काळ्या रंगाचा झाला आहे. असा हा सगुण-निर्गुणरूपी पांडुरंग आहे.

Panduranga is both Saguna (with attributes) and Nirguna (without attributes)—He is one and the same!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *