व्यक्ती विशेष
देवयानी सोनार
पर्यटनातून ‘परमार्थ’
लोकांना पर्यटन, तीर्थयात्रा घडविण्यासह इतरांना ज्याच्यातून आंनद मिळतो अशा गोष्टी आयुष्यभर करीत राहण्याचा मानस मंचर तळेघर येथील सूर्यकांत धायबर (बाबा) करीत आहेत. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून लोकांना पर्यटनासह तीर्थयात्रा घडविण्याचे काम करीत असताना यात्रेतून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करून जनहिताची कामे वृद्धाश्रम, गोशाळा तसेच अमरनाथ सेवा संघाची स्थापना केली आहे. या अमरनाथ सेवासंघाच्या माध्यमातून आसपासच्या शाळा, विद्यार्थ्यांना मदत सोयीसुविधा पुरविण्याचे काम केले जात आहे. यासाठी समाजातील अनेक चांगल्या दात्यांनाही मदतीचा मोह होतो. बाबांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आजपर्यंत मंडपवाल्यापासून आचारी, मदतनीस महिलांबरोबर अनेक गरजूंना मोफत तीर्थयात्रा घडविल्या आहेत. आपण समाजाचे देणे लागतो हा भाव मनात ठेवून अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून गोरगरिबांसह अनेक गरजूंना मदत अविरतपणे करीत आहेत.
मंचर येथील तळेघर येथे मोठ्या स्वरूपात वृद्धाश्रम, गोशाळा साकारली जात असून, वृद्धाश्रमात येणार्या व्यक्तीला निसर्गाचा आनंद मिळावा. आयुष्याची संध्याकाळ निवांत जगता यावी यासाठी विशेष प्रयत्न असून, विनामूल्य वृद्धाश्रम लवकरच सुरू होणार आहे.
तीस ते पस्तीस वर्षांत तीस ते चाळीस हजार लोकांना त्यांनी अमरनाथ यात्रा घडविली आहे. वैष्णोदेवी येथे एकाचवेळी चार हजार सातशे महिलांना यात्रा घडविली आहे. पर्यटन आणि तीर्थयात्रेतून मानसिक आनंदाची अनुभूती मिळत असून, हे कार्य कायम सुरू राहण्यासाठी बाबा प्रयत्नशील आहेत. अमरनाथ यात्रेतील अनंत अडचणीची असली तरी सूर्यकांत धायबर बाबा आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत यात्रा निर्विघ्न पार पडते असे अनेक पर्यटक, यात्रेकरूंचे अनुभव आहेत. अमरनाथची यात्रा करावी असे कधी मनात आले आणि कुठून या खडतर यात्रेस सुरुवात झाली याबाबत विचारले असता बाबांनी सांगितले की, तीस वर्षांपूर्वी एका प्रवासात साधूंचे बाबा बर्फानीबद्दल चर्चा ऐकण्यात आली. ते ऐकून मनात इच्छा निर्माण झाली आणि दर्शनाला गेल्यावर भगवान शंकराचे अस्तित्व जाणवले. त्यावेळेपासून यात्रेची सुरुवात झाली. यात्रेला नेणार्याचा आणि यात्रेला जाणार्याचा उद्देश चांगला असेल त्यावेळी ईश्वरी कृपेने यात्रा सफल होते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन आजपर्यंत एकाही यात्रेकरूचे टळलेले नाही. गेल्या तीस वर्षांत एकही यात्रेकरू पर्यटकांमध्ये वाद झालेले नाहीत. लोक सहभागी होतात. अध्यात्म, तीर्थाटन, पर्यटनाचा आनंद घेतात. घरी गेल्यावर अभिप्राय पाठवतात. पर्यटन, तीर्थयात्रा कमी खर्चात व्हायला हवी, असे कटाक्षाने पाळतात. यात्रा, पर्यटनातून पैसा कमावणे हा उद्देश नाही. व्यवसाय म्हणून सहली काढत नाहीत. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून पर्यटन, तीर्थयात्रेशी संबंधित हॉटेल चालक, वाहनचालक -मालक, आचारी यांच्याशी संबंध अतिशय चांगले जोपासले असल्याने ते सर्व आमच्याकडे टुरिस्ट म्हणून पाहत नाही तर आपल्याकडूनही सेवाभाव दृष्टीने पाहून दर यात्रेला सहकार्य आणि उत्तम सेवा देतात. त्यामुळे आजपर्यंत एकही पर्यटक, यात्रेकरू कोणत्या गोष्टीवरून नाराज झालेला नाही. ही खासीयत असल्याने आमच्या प्रत्येक ट्रीपची जाहिरात आम्हाला करावी लागलेली नाही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला अमरनाथ यात्रा असते. चारधाम,काश्मीर वैष्णोदेवी,राजस्थान,अजमेर,केरळ कन्याकुमारी,नर्मदा परिक्रमा,अष्टविनायक आदींसह परदेशातही सहली सुरू असतात.
पर्यटन,तीर्थयात्रेचा आनंद प्रत्येकाला मिळावा हा त्यांचा प्रयत्न असतो. गरीब श्रीमंत हा भेद न करता गरिबालाही यात्रा घडावी यासाठी अनेकदा त्यांनी यात्रा घडविल्या आहेत. प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी दर यात्रेत नव्या इच्छुक गरिबांना संधी देतात.अनेक गरीब गरजू महिला, पुरुषांना विमानयात्रादेखील घडविली आहे. यात्रेच्या निमित्ताने बाबांनी पुढची चांगली फळी तयार केली आहे.
अमरनाथ यात्रा श्रीनगर ते बालताल नव्वद किमी आहे. बालतालवरून घोड्यावरून जाण्यासाठी सोळा किलोमीटर अंतर आहे. पायी जाणार्यांसाठी पायी चौदा किमी.आहे. घोड्यावरची साडेतीन ते चार तासांत यात्रा पूर्ण होते. रस्ते छोटे आहे. भाविकांच्या मनात अनेक प्रश्नाचे काहूर असते
एक बुरानवाणी दहशतवादी काश्मीर खोर्यांमध्ये दहशत माजविली होती. भारत सरकारकडून त्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यादरम्यान काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आग उसळली होती. याचवेळी अमरनाथला साडेचारशे लोकांना घेऊन आम्ही चाललो होतो. त्यावेळी एका ठिकाणी पोलिसांकडून अडविण्यात आली होती. अडविण्याचे कारण त्या दहशतवाद्याचा मिलिटरीकडून खातमा करण्यात आल्यामुळे संतप्त दहशतवाद्यांच्या साथीदारांकडून दोन पोलिसांची मुंडकी उडविली होती.आणि पाकिस्तानकडून काश्मीर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी दगडफेक आणि यात्रेकरूंवर हल्ला होत होता. त्यामुळे पुढची खबरदारी म्हणून आम्हाला रोखण्यात आले होते. जवळपास आमचे आणि इतर चाळीस ते पन्नास हजार यात्रेकरू अडकून पडले होते. सोबतचे सहकारी यात्रा मागे वळविण्यास सांगत होते. परंतु मनात प्रबळ इच्छा असल्याने आणि दर गुरुपौर्णिमेला ज्या बाबा बर्फानीने दर्शन दिलेले होते ते दर्शन यावेळीही भाविकांना नक्कीच होणार असा विश्वास होता. या गाडी अडविल्याच्या घटनेच्या दुसर्या दिवशी आम्ही आंदोलन करीत लेह लडाख रस्ता अडविला त्यावेळी रास्ता रोका करीत असताना तेथे पन्नास हजार लोक अडकून पडली होते. त्यावेळी पाच हजार लोकांनी पुढे येत आम्हाला साथ दिली. तेथील डीआयजी, जिल्हाधिकारी यांनी आमच्यासोबत चर्चा केली त्यांनी रस्ता न अडविण्याबद्दल सांगितले. त्यांच्याशी आम्ही आमचा मुद्दा पटवून सांगितला. त्यांनी वरिष्ठांना याबाबतीत विचारणा करून घेत आठ वाजेला निर्णय सांगू असे आश्वासन दिले. त्यानंतर बरोबर आठ वाजता सकारात्मक निर्णय दिला आणि पन्नास हजार मिलिटरींच्या बंदोबस्तात रात्री अकरा वाजता दर्शनासाठी आम्हाला सोडण्यात आले. एका दर्शनावेळी बारा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी एका गाडीवर दगड पडल्याचे लक्षात आल्यावर पुढील घटनेची कल्पना आली होती. कदाचित अतिरेकी हल्ला असू शकतो.त्यामुळे आम्ही महिलांना बस सीटच्या खाली बसण्यास सांगितले. या बसेसवर भरपूर दगडफेक झाली. महिलांचे रडणे,घाबरून ओरडणे आदी परिस्थितीला तोंड देत गाड्या न थांबविता मिलिटरी कॅम्पपर्यंत आणल्या. अशा अनेक चित्तथरारक घटना घडल्या आहेत.परंतु दर्शनापासून कोणीही वंचित राहिले नाही हे विशेष.
तीर्थयात्रा हा आमचा व्यवसाय नाही
कोणतीही तीर्थयात्रा ही श्रद्धेतून होत असते. पर्यटन आणि तीर्थयात्रेतून सकारात्मक ऊर्जा मिळते. जो ज्याच्या जीवनात आनंदी त्याला देव भेटला असे समजायचे. गोरगरिबांना मदत करायची. देव आपल्यावर लक्ष ठेवत आहे. प्राणिमात्रांवर प्रेम करायचे या गोष्टी आपोआप समजायला लागतात. त्यामुळे आपसूकच ज्ञात होतात. आपले मन न्यायाधीश असते. मनच आपल्याला सांगत असते. आपण चांगले वागलो की वाईट? ज्यावेळी आपण चांगले वागलेलो असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा तयार होते. ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आयुष्यात कामी येते. वाईट वागलो असल्यास आपले मनच कमकुवत होते. ईश्वरी संगत महत्त्वाची आहे.
– सूर्यकांत धायबर (बाबा), मंचर
सिडको: विशेष प्रतिनिधी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या…
मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात मनमाड (प्रतिनिधी) :- शेगावचे गजानन महाराज यांचा…
जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या सिडको : विशेष प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर पत्नीने…
नाशिक: प्रतिनिधी नाशिकरोड येथे एका युवकाचा दगड टाकून तसेच धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा नाशिक: प्रतिनिधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा…
दहा हजारांची लाच घेताना वनविभागाचे दोघे जाळ्यात नाशिक : प्रतिनिधी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना…