नाशिक

पालकत्व म्हणजे जीवन जगून दाखवण्याची कला

– अनुराधा सोनवणे
पालक होण्यापूर्वी जीवनाचा विद्यार्थी आणि चांगला खेळाडू बना. पालकत्व ही वेगळी जबाबदारी नाही. ती जगण्याची एक पद्धत आहे. पालकत्व म्हणजे मुलांना जीवनाबद्दल शिकवण्याची प्रक्रिया नाही, तर जीवन कसे जगायचे हे आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवण्याची प्रक्रिया आहे. मुलांना शिकवण्यासाठी वेगळा अभ्यासक्रम लागत नाही. ते आपल्या प्रत्येक कृतीतून, विचारातून, वागण्यातून, निर्णयांतून, प्रतिसादातून आणि नात्यांतून शिकत असतात. म्हणूनच पालकत्व हे सिद्धांत नसून, प्रत्यक्ष जीवनातील आचरण आहे.

जर आपण आयुष्यभर शिकणारे, वाढणारे आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी समजून घेणारे जीवनाचे विद्यार्थी झालो, तर आपली मुलेही तशीच घडतात. जर आपण जीवनाकडे खेलाडूवृत्तीने पाहिले, तर जिंकताना नम्रता, हरताना धैर्य आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याची वृत्ती त्यांनाही मिळते. पालक होण्यापूर्वी चांगला माणूस बना. चांगला जीवनसाथी बना. एकमेकांचा आदर करणारा, सहकार्य करणारा आणि जबाबदारी वाटून घेणारा संघसदस्य बना. जेव्हा आपण स्वतः जबाबदार व्यक्ती बनतो आणि जीवनाकडे खेलाडूवृत्तीने पाहतो, तेव्हा पालकत्व हे वेगळे काम राहत नाही; ते आपल्या जगण्याचाच नैसर्गिक आणि सहज भाग बनते. पालकत्व ओझे नसते, तर जगण्याची सुंदर पद्धत बनते. आनंदी, निरोगी, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण कौटुंबिक वातावरण ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची सवार्ंत मजबूत पायाभरणी असते. जबाबदार व्यक्तीचे अस्तित्वच मुलांसाठी सर्वांत मोठी शिकवण असते. घरातील प्रेम, आदर, शांतता, विश्वास आणि जबाबदारी मुलांच्या मनाला स्थैर्य देतात. अशा वातावरणात वाढलेली मुले आव्हानांना घाबरत नाहीत. नकारात्मक अनुभवांमध्येही संधी शोधतात. अडचणींना सामोरे जात योग्य आणि सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे नकारात्मकता त्यांना वाहवत नेत नाही उलट ती त्यांच्यात अधिक चांगले परिणाम आणि नवीन शक्यता निर्माण करण्याची क्षमता विकसित करते.
घरात एखादी अडचण आली तर आई-वडील एकमेकांवर दोष टाकतात की, शांतपणे उपाय शोधतात? मुलं त्या समस्येचे उत्तर विसरतील, पण समस्या आल्यावर कसे वागायचे, कसा प्रतिसाद द्यायचा आणि नाती कशी जपायची, हे आयुष्यभर लक्षात ठेवतील. जर आपणच बेजबाबदार, निष्काळजी आणि प्रतिक्रियात्मक जीवन जगलो, तर गोंधळ, तणाव आणि नकारात्मकता नकळत संपूर्ण कुटुंबात पसरते. मुले आपण तयार केलेल्या वातावरणातूनच जग पाहायला, विचार करायला आणि प्रतिसाद द्यायला शिकतात. जबाबदारी म्हणजे केवळ कर्तव्य पार पाडणे नव्हे, तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्याची कला आहे. आपण आपल्या जीवनात काय स्वीकारतो आणि काय नाकारतो, कोणते विचार वाढवतो आणि कोणते थांबवतो, यावरच आपल्या कुटुंबाची दिशा ठरते. जीवन म्हणजे केवळ यश मिळवणे नाही. जीवन म्हणजे प्रत्येक छोट्या क्षणाचा आनंद साजरा करणे आणि प्रत्येक परिस्थितीला अधिक चांगल्या दिशेने वळवण्याची कला शिकणे. जीवन साधे ठेवा, पण मूल्यांनी समृद्ध ठेवा. नैतिकता, मानवता, संवेदनशीलता आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती जोपासा. चांगल्या आणि कठीण दोन्ही काळांचा समतोलाने स्वीकार करा. खरा खेळाडू प्रत्येक सामन्यातून शिकतो; तसाच जीवनाकडेही पाहा. नात्यांची समृद्धी हीच जीवनाची खरी श्रीमंती आहे. आलिशान वस्तू नव्हे, तर विश्वास, प्रेम, सहकार्य, संवाद आणि परस्परांचा आदर जीवनाची गुणवत्ता वाढवतात. आपल्या मुलांनी जसे व्हावे असे आपल्याला वाटते, तसे प्रथम आपण स्वतः बना. पण त्यांना आपली प्रतिकृती बनवू नका. त्यांना त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांसह, त्यांच्या सामर्थ्यासह आणि त्यांच्या स्वप्नांसह उमलू द्या. प्रत्येक मूल हे स्वतःमध्ये वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते; त्याला त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात फुलू द्या. जसे एका छोट्याशा बीजाला सुपीक माती, शुद्ध हवा, पुरेसा सूर्यप्रकाश आणि योग्य वातावरण मिळाले तर ते एका भक्कम रोपात वाढते, तसेच मुलांनाही प्रेम, मूल्ये, सुरक्षितता आणि सातत्याने शिकत राहणारे वातावरण मिळाले तर त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम, संवेदनशील, सकारात्मक, जीवनाचा आनंद घेणारे बनते. आपण मुलांना देऊ शकणारी सवार्ंत मोठी भेट म्हणजे संपत्ती नव्हे, तर आनंदी, शिकणारे, वाढणारे, जबाबदार, उपाय शोधणारे आणि जीवनाचा उत्सव साजरा करणारे मन. कारण पालकत्व हे मुलांना घडवण्याचे काम नाही; ते स्वतःला घडवत जगण्याचा, जबाबदारीने प्रतिसाद देत वाढत राहण्याचा आणि जीवन अधिक सुंदर बनवत राहण्याचा अखंड प्रवास आहे.

Parenting is the art of demonstrating how to live life.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago