शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांवर ताण

साहित्य आणि शुल्कवाढीचा दुहेरी फटका

नाशिक : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पाश्वर्र्भूमीवर शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत पालकांची गर्दी वाढू लागली असताना, वाढत्या महागाईने त्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, शालेय शूज, टीफिन बॉक्स, वॉटर बॅग अशा सर्वच साहित्याच्या किमतींत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शिक्षणाचा खर्च अधिकच वाढला आहे. त्यातच खासगी शाळांनी केलेली शुल्कवाढ पालकांच्या चिंतेत भर घालत आहे.
रविवार कारंजा, मेन रोड, भद्रकाली आणि अशोक स्तंभ परिसरातील पुस्तक व स्टेशनरी दुकानांत सध्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते आहे. यंदा आकर्षक डिझाइनच्या अर्गोनॉमिक बॅगा, कार्टून थीम असलेल्या वह्या, आधुनिक पेन्सिल बॉक्स, स्टीलच्या बाटल्या आणि विविध प्रकारचे टीफिन बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत. मुलांना या वस्तूंचे आकर्षण असले तरी त्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे पालकांना बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे.
व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे शालेय साहित्य महागले आहे. गेल्या वर्षी 500 ते 700 रुपयांत मिळणारी शालेय बॅग यंदा 700 ते 1200 रुपयांना विकली जात आहे. वॉटर बॅग, टीफिन बॉक्स, शूज आणि रंग साहित्याच्या किमतींतही लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, खासगी शाळांनीही शुल्कामध्ये 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढ केल्याने पालकांंवरील आर्थिक भार वाढला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मोठा खर्च करावा लागत असल्याने अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

शालेय साहित्याच्या किमतींत वाढ
शालेय बॅग : 500-700 वरून 700-1200 रुपये
वॉटर बॅग : 200-350 वरून 350-600 रुपये
टीफिन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, शूज, रंग साहित्य महागले
गणवेशाच्या खर्चातही वाढ
खासगी शाळांचे शुल्क 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढले.

यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. शाळा सुरू होण्यास थोडेच दिवस बाकी असल्याने पालकांची मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.
– अमित पाटील, शालेय साहित्य विक्रेते

काही दिवसांपूर्वीच मुलाची शाळेची फी भरली. त्यातही वाढ करण्यात आली आहे. आता शालेय साहित्य खरेदीसाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच एवढा मोठा खर्च झाल्याने पुढील खर्चाचे नियोजन करणे अवघड झाले आहे.
– संतोष निकम, पालक

Parents under stress even before schools reopen.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *