पाखरे निघाली शाळेला…

15 जूनला शाळा प्रवेशोत्सवाची धामधूम

नाशिक : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त 15 जून रोजी होणारा जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव यंदा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात व्यापक तयारी सुरू झाली आहे. 6 ते 14 वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रशासन, शिक्षक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांना सहभागी करून जिल्हाभर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद नाशिककडून पाखरे निघाली शाळेला अभियानांतर्गत 10 ते 15 जूनदरम्यान नियोजनबद्ध तयारी करण्यात येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरापासून गटस्तरापर्यंत तयारी सुरू आहे.
प्रवेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि गटस्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या शाळा भेटी, शाळाव्यवस्थापन समित्या आणि पालक सभा, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरभेटी तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. शाळा प्रवेशोत्सव खर्‍या अर्थाने ’आनंदोत्सव’ ठरावा, यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील वर्ग-1 आणि वर्ग-2 चे सर्व शासकीय अधिकारी 15 जून रोजी विविध शाळांना भेट देणार आहेत. शाळांमध्ये स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय व्हावे यासाठी शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविला जात आहे. पहिले पाऊल यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रवेशोत्सवाच्या दिवशी गावोगावी प्रभातफेरी, देशभक्तिपर गीते, नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षावाने स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण, मिष्टान्न भोजन, तसेच निपुण विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची प्रेरणादायी सुरुवात व्हावी यासाठी विविध नािीवन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, सर्व लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, वीरमाता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्या माध्यमातून हे निमंत्रण तालुकास्तरीय शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांमार्फत पोहोचविले जात आहे.
शाळा ही गावाच्या विकासाचे केंद्र मानून समाजाचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने 6 ते 14 वयोगटातील 100 टक्के बालकांची नोंदणी आणि उपस्थितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक प्रवेशपात्र बालक शाळेत दाखल होण्यासाठी शिक्षकांना विशेष पाठपुराव्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपल्या गावातील प्रत्येक बालक शाळेत आणि प्रत्येक शाळा समाजाच्या सहभागाने समृद्ध करण्याच्या उद्देशाने यंदाचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनीही हा उत्सव गावाचा उत्सव म्हणून साजरा करावा.
-ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

 

The little birds have set off for school…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *