‘मोक्का’तून सुटण्यासाठी पाटणकर, लोंढे गँगचा कट

नाशिक : प्रतिनिधी
मोक्का गुन्ह्यातून सुटण्यासाठी आणि तपास अधिकार्‍यांची बदनामी करण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करत, त्याच्याकडून एका खोट्या अर्जावर बळजबरीने स्वाक्षरी घेऊन पोलिसांविरुद्ध लोंढे आणि पाटणकर गँगने नाशिकरोड कारागृहात कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाटणकर आणि लोंढेबरोबरच वकील आणि दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तक्रारदार महेश गोकुळ सोनवणे उर्फ चिमण्या (वय 23, रा. सातपूर, नाशिक) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यात (गु.र.क्र. 96/2026) मोक्का कायद्यांतर्गत अटक होऊन महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना, तेथे आधीपासूनच असलेले आरोपी हर्षद सुनील पाटणकर आणि दीपक प्रकाश लोंढे यांनी महेशला वारंवार धमकावण्यास सुरुवात केली. आरोपींच्या मोक्का गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत आणि सुचित सोळुंके यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अडचणीत आणण्यासाठी आरोपींनी वकील यतीश देसले यांच्या मदतीने एक कट रचला होता. पोलिसांवर फायरिंग व मारहाणीचे खोटे आरोप लावणारा एक अर्ज वकील देसले यांनी तयार केला होता आणि त्यावर महेशची स्वाक्षरी त्यांना हवी होती. महेश सोनवणे याने या बनावट अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला असता, कारागृहात बंदी लागण्यापूर्वी आरोपींनी महेशला एकाकी गाठले. आज तुला जिवानिशी ठार मारून, तुझी विकेट घेतो, अशी धमकी देत दीपक लोंढे याने महेशचे पाय धरले, तर हर्षद पाटणकर याने दोन्ही हातांनी गळा दाबून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जीव गुदमरल्याने आणि जिवाची भीती वाटल्याने नाइलाजास्तव महेशने त्या अर्जावर स्वाक्षरी केली.
या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी हर्षद सुनील पाटणकर, दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, वकील यतीश देसले आणि त्यांचे अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इ.छ.ड.) 2023 च्या कलम 109, 61(2), 318(4), 336(3), 336(4), 340(2), 351(2), 352, 3(5) आणि फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 1932 चे कलम 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (अझख) प्रवीण सूर्यवंशी करत आहेत. कारागृहातच कैद्यांवर होणार्‍या या जीवघेण्या हल्ल्यामुळे आणि वकिलाच्या सहभागामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

♦ नाशिकरोड कारागृहात कारनामा
♦ कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
♦ वकिलाचाही कटात सहभाग

असा उघडकीस आला प्रकार

जामिनावर सुटल्यानंतर 15 जून 2026 रोजी महेश सोनवणे याला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी एका चॅप्टर कारवाईकामी बोलावले असता, तिथे अधिकार्‍यांनी त्याला त्याच्याच नावाने आलेला तो खोटा अर्ज वाचायला दिला. हा अर्ज आपण दिलेला नसून, त्यावर बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात आल्याचे आणि पोलिसांची बदनामी करण्यासाठी व न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा अर्ज वापरण्यात आल्याचे महेश याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ पोलिसांत सर्व हकिकत सांगून तक्रार दाखल केली.

Patankar, Londhe gang plot to escape from ‘Mokka’

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *