पेट्रोेलपंपावरील सेवा उरल्या फक्त कागदावरच!

सुविधांमध्ये काळानुरूप बदल व्हावे अशी पेट्रोलपंपचालकांची मागणी

नाशिक ः प्रतिनिधी

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु, पेट्रोलपंपांवर ग्राहकांना काही सुविधा मोफत देणे अनिवार्य आहे. हवा भरणे, स्वच्छतागृह उपलब्ध असणे, फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून देणे आदी आवश्यक सेवांचा यात समावेश आहे. मात्र शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक पेट्रेालपंपांवर सुविधांचा अभाव दिसून येत असल्याचे चित्र आहे.
सर्व सुविधांसाठी केंद्र सरकारच्या समितीने सुचविलेले मार्जिन मिळावे ही पंपचालकांची मागणी बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सुविधांमध्ये काळानुरूप बदल व्हावे, अशी पेट्रोलपंपचालकांची मागणी आहे.
जिल्ह्यात एकूण 450 पेट्रोलपंप आहेत. सर्वच पेट्रोलपंपांवर मार्केटिंग डिसिप्लीन गाइडलाइन्सनुसार ग्राहकहिताच्या सोयी असणे बंधनकारक आहे. परंतु, सुविधा असून त्या वापरण्यासारख्या नसल्याने अनेकदा ग्राहकांना मनस्ताप होतो. अस्वच्छ स्वच्छतागृह असणे, पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांची तोडफोड झालेली अशा अनेक तक्रारी ग्राहक करताना दिसतात. ग्राहकांना सुविधा न मिळाल्यास सुपरवायझर अथवा मॅनेजर किंवा डिलरशी संपर्क करून संबंधित माहिती द्यावी.
प्रवास, पर्यटन करताना वाहने सुस्थितीत असल्याची खातरजमा करूनच प्रवास केला जातो. अनवधानाने काही कारणास्तव प्रवास करावा लागतो. प्रवास करताना इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर इंधन देण्याबरोबर इतर मोफतच्या सुविधा देणे पेट्रोलपंपचालकांना बंधनकारक असते. मार्केटिंग डिसिप्लीन गाइडलाइन्सनुसार काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत वाहनात हवा भरण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमलेला असतो. हवा भरण्याची सुविधा पेट्रेाल भरल्यानंतर मोफत देण्याची सुविधा केलेली असणे गरजेचे आहे. पाण्याची सुविधा, स्वच्छ पाणी पिण्याची सुविधा आरओ, वॉटर प्युरीफायर, फ्रीज आदींची सुविधा केलेली असते.इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पाणी मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पेट्रोलपंपावर स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. ते ग्राहकांना मोफत उपलब्ध करणे गरजेचे आहे. स्वच्छतागृहातील सुविधा पाणी, स्वच्छता याबाबतीत काही कमतरता असेल अशा वेळी त्याची तक्रार करू शकतात. संकटसमयी ङ्गोनची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. ग्राहकांना अडचणी, आपत्कालीन वेळी फोनची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्रथमोपचार पेटी असणे ती ग्राहकांना गरजेनुसार उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. इंधनाबाबतीत ग्राहकांना कोणतीही शंका असल्यास त्याचे निराकरण करणे गरजेचे आहे. अचानक आग लागल्यास वाळू असलेल्या बादल्या, फायरसेप्टी उपकरणे आदी उपलब्ध असणे मार्केटिंग डिसिप्लीन गाइडलाइन्सनुसार सर्व सोयी असायला हव्यात.

सर्व सुविधा उपलब्ध असतात. ग्राहकांना त्या नाकारल्यास त्याबाबत ड्युटीवरील सुपरवायझर अथवा मॅनेजर यांना भेटावे. त्यातून समाधान न झाल्यास डीलरला संपर्क करावा. पेट्रोलपंपावर स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ टॉयलेट, प्रथमोपचार व गाडीची टायरची हवा मोफत हे केवळ त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतात तसेच तसेच इंधनाची गुणवत्ता व शुद्धता तपासण्याचे व वजन माप देखील उपलब्ध असते. वरील सर्व सेवांपैकी मुख्यतः टॉयलेट व गाडीची हवा तापसण्याकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून
येतो.

सुदर्शन पाटील (सचिव, डिस्ट्रिक्ट पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशन)

प्रत्येक पंपावर सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. जर या सुविधा कुठे नसतील तर पंपावर नंबर लिहिलेल्या विक्री अधिकार्‍यांकडे तक्रार करू शकता.
प्रत्येक पेट्रोलपंपावर फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध असतो. पेट्रोलपंपावर केवळ त्या पंपांचे ग्राहकांसाठी मोफत स्वच्छतागृह उपलब्ध असते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपवादात्मक परिस्थितीत पंपचालक योग्य त्या कारणाने मज्जाव करू शकतो.तसेच केंद्र सरकारच्या अपूर्व चंद्रा कमिटीने यासाठी पैसे आकारण्याची शिफारस केली आहे. डिझेल व पेट्रोलची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार आहे. तक्रार पुस्तक उपलब्ध हवे.
टायर्समध्ये हवा भरण्याची सुविधा उपल्बध पाहिजे. ती हवा भरण्यासाठी माणूस उपलब्ध असणे व हवा मोफत देणे हे बंधनकारक नाही. ती पंपचालकांनी ग्राहकांना दिलेली जादा सर्व्हिस आहे. मागितल्यावर बिल देणे तसेच पंप सुरू व बंद होण्याची वेळ लिहिणे बंधनकारक आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध असणेही गरजेचे आहे.
या सुविधांमध्ये काळानुरूप बदल व्हावे तसेच या सर्व सुविधांसाठी केंद्र सरकारच्या समितीने सुचविलेले मार्जिन मिळावे ही देखील पंपचालकांची मागणी बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित आहे.

-विजय ठाकरे, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स संघटना

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *