आवश्यक औषधांचा साठा करून ठेवा
नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ 20 मे रोजी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता व संयम राखावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सहआयुक्त (औषधे) नाशिक विभाग अ. तु. बर्डे यांनी केले आहे.
या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती दक्षता घ्यावी.
औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी सु. सा. देशमुख, सहाय्यक आयुक्त (औषधे) भ्रमणध्वनी 9850177853, चं. अ. मोरे, सहाय्यक आयुक्त (औषधे), म. वि. देशपांडे, सहाय्यक आयुक्त (औषधे) या अधिकार्यांशी संपर्क साधावा.
काळजी घेणे आवश्यक
रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन, सहआयुक्त बर्डे यांनी केले आहे.
Pharmaceutical Dealers Association closed for business on Wednesday