नाशिक :गोरख काळे
शासनाने सिंगल यूज प्लास्टिक आणि 150 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घातली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या विक्री-खरेदीत गुंतलेल्या व्यापार्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यानुसार गत आठवडयात पालिकेने साठ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.
नाशिक महापालिकेने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर करणार्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने 1 ते 7 जुलै दरम्यान सहा विभागात कारवाई करण्यात येऊन 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसर्यांदा पकडले गेल्यास अनुक्रमे 5,000 आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तिसर्यांदा बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री-खरेदी करताना पकडलेल्या व्यापार्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. चुकीचे व्यापारी चौथ्यांदा पकडले गेल्यास त्यांच्याविरुद्ध महापालिका पोलिसात गुन्हे दाखल करणार आहे. घनकचरा विभागाच्यावतीने पंचवटीत दोघांवर कारवाई करीत 10000 रू. सातपूर 5000रू. सिडको 15000 रु. नाशिकरोड 20000 रु. नाशिक पश्चिम 5000 रु. नाशिक पुर्व 5000 रु याप्रमाणे एकूण 11 जणांवर कारवाई करून 60 हजार रूपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली.