नाशिक :अश्विनी पांडे
शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना झाली. अमरनाथ यात्रेसाठी देशभरातील भाविक गेले आहेत. नाशिकहून अनेक भाविक यात्रेसाठी गेले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेची माहिती समोर येताच यात्रेला गेलेल्या यात्रेकरूनचे नातेवाईक, मित्रमंडळी चिंताग्रस्त झाले आहेत. दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ज्याच्याशी थेट मोबाईलवरून संपर्क होऊ शकत नाही अशा भाविकांचे नातेवाईक हेल्पलाईनवर संपर्क करत आपल्या आप्तेष्टांची खुशाली जाणून घेत आहेत. नाशिक शहरातून शंभराहून अधिक भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. त्यात काही ट्रॅव्हल्स कंपनीच्यावतीने तर काही भाविक स्वतःच यात्रेसाठी गेलेले आहेत. यात्रेसाठी गेलेल्या भाविकांपैकी सुमारे 70 ते 80 भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच्या मागील बाजूस अडकले होते. तर 50 ते 60 भाविक दर्शनानंतर पुढे आले होते. ते सुखरूप आहेत. नाशिक शहरातून 100 हून अधिक भाविक आठ दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेला गेले होते. तर सोमवारी जम्मु तावी ला पोहचल्यानंतर बुधवारपासून टेकडी चढण्यास सुरूवात केली. डोंगरावर जात असताना चांगले वातावरण होते पण दर्शन झाल्यानंतर खाली येत असताना अचानक ढग फुटी झाली आणि भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर चिंतेचे ढग उभे राहिले. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर नातेवाईकांकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अनेकांचे सुखरूप असल्याचे निरोप आले असले नातेवाईक मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. तर जे भाविक ट्रॅव्हल्सकंपनीच्यावतीने न जाता स्वत गेले आहेत असे किती नाशिककर भाविक आहेत याची माहिती अद्याप नाही.