नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरात जुन्या वादातून फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्या संशयितांवर उपनगर पोलिसांनी कठोर कारवाई करत कॅनॉल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून कोयता गँगची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रविवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून फळविक्रेता इम्तियाज इसरार खान (वय 27, रा. मगर चाळ, कॅनॉल रोड) यांच्यावर सात ते आठ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. संशयितांनी हातात शस्त्रेे घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी इम्तियाज खान यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही
फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे सोहेल पठाण, जुनेद सय्यद, यश वाबळे, अभिजीत साळवे, विनोद घुगे यांच्यासह आणखी दोन ते तीन साथीदारांना अल्पावधीत अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कॅनॉल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कडक इशारा दिला. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जेलरोड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अधिक प्रभावी गस्त व कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच कॅनॉल रोड परिसरात घरांवर दगड-फेक करणार्या संशयितांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली.
याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणार्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले.
या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, राहुल वाळके, नवनाथ पोरजे, महेश कचरे, मिलिंद बागूल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Police crack down on Koyata gang at Jail Road