आमदार संजय उपाध्याय यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मुंबई : प्रतिनिधी
येणार्या नवरात्रोत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर सोशल मीडियावर ’रेंट ए गरबा पार्टनर’ या नावाने दिशाभूल करणार्या जाहिराती प्रसारित होत आहेत. यामागे असामाजिक तत्त्वांचा हात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून तरुणींची फसवणूक किंवा सेक्स रॅकेट चालवले जाण्याची दाट शक्यता असल्याने, याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.
बोरिवली येथील ’सेवालय’ कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार उपाध्याय बोलत होते.
यावेळी उत्तर मुंबई भाजप मीडिया प्रभारी नीला बेन सोनी आणि माजी नगरसेवक प्रवीण शाह हेदेखील उपस्थित होते. इन्स्टाग्रामवर प्रसारित होत असलेल्या या संशयास्पद जाहिरातीत अवघ्या 1,000 रुपयांमध्ये ’सिल्व्हर पॅकेज’ अंतर्गत एका तासासाठी गरबा पार्टनर उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच वेळेनुसार 1,500 ते 2,000 रुपये आकारून ’गोल्ड’ व ’प्लॅटिनम’ पार्टनर देण्याचे आमिष दाखवण्यात आले असून, चक्क दोन-तीन तासांपासून ते 24 तासांपर्यंत पार्टनर उपलब्ध करून देण्याची भ्रामक ऑफर यात देण्यात आली आहे.
‘पार्टनर’ सक्ती कुठेही नाही
कोणत्याही गरबा महोत्सवात केवळ ’पार्टनर’ सोबतच प्रवेश मिळतो किंवा सलग चोवीस तास गरबा खेळला जातो, असा प्रकार कुठेही अस्तित्वात नाही, असा थेट सवाल आमदार उपाध्याय यांनी उपस्थित केला आहे. या जाहिरातीत वापरण्यात आलेली भाषा अत्यंत संशयास्पद असून, नवरात्रीच्या नावाखाली हे कोणते रॅकेट चालवले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यातून पुढे जाऊन तरुणींना ब्लॅकमेल करणे, त्यांची फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे घडू शकतात, अशी रास्त भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Possibility of a sex racket under the guise of ‘Rent-a-Garba Partner’