सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर स्ट्रेचरवर झोपून आंदोलन मागे
निफाड : तालुका प्रतिनिधी
वेळोवेळी मागणी करून, निवेदने देऊन आणि प्रत्यक्ष भेट घेत सांगूनदेखील पिंपळस ते विंचूरदरम्यान महामार्गावरील खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने दररोज अपघात होत आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि या रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारांचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुपारी चारला शिवसेना ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसतर्फे निफाड तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर ढोल-ताशा आणि वाजंत्री वाजवत विक्रम रंधवे यांनी रस्त्यावर स्ट्रेचर टाकून व सलाईन लावून अनोखे आंदोलन केले.
यावेळी महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्य कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क करीत निफाड बांधकाम विभागाचे मोहित चौधरी यांनी आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दीच गर्दी होती आणि शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उगारल्याने प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांची तारांबळ उडाली होती. स्वतः विक्रम रंधवे हे सलाईन लावलेल्या अवस्थेत स्ट्रेचरवर झोपले होते. या आंदोलनावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे, खरेदी-विक्री संघाचे संचालक बापूसाहेब कुंदे, सुभाष आवारे यांनी मनोगतात संताप व्यक्त केला. अखेर निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी मध्यस्थी करीत व सार्वजनिक बाधकाम विभागाला खडे बोल सुनावत येथे येऊन निवेदन घेण्याची सूचना केली. आंदोलनकर्ते अभियंता येण्यावर ठाम होते. अखेर नाशिकचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी स्थानिक अधिकारी पाठवत निवेदन स्वीकारले. आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी गणेश कापसे, सचिन गिते, शिवा सुराशे, बापू कुंदे, मधुकर शेलार, संजय कुंदे, डॉ. फैयाज शेख, कैलास धारराव, रत्नाकर गाजरे, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे, सुनील निकाळे, आनंद डांगळे आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहा वर्षांपासून या रस्त्यावर केवळ खड्डे भरायचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता खराब झाला. आता या कामाला नवीन मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे काम पाच ठेकेदार करीत आहेत. सध्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम एका बाजूने चालू आहे. मात्र, दुसर्या बाजूच्या विंचूरपर्यंत रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवून देऊ.
– अभियंता मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग, निफाडरस्त्यावरील खड्ड्यांमुळे माझी एकुलती मुलगी सिद्धी लुंगसे हिला जीव गमवावा लागला. मात्र, अधिकार्यांनी आजपर्यंत साधी दखल घेतली नाही. आजदेखील विंचूरजवळ याच रस्त्यावरील खड्ड्यात तीन तरुण पडून जखमी झाले. त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांचा खर्च कोण करणार, दररोज अपघात होत आहे. मात्र, साधे खड्डे बुजवले जात नाही.
– मंगेश लुंगसे, शेतकरी, नागापूर, ता. निफाडमी गेल्या चार महिन्यांपासून या कामाचा पाठपुरावा करतो; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साधा फोन घेत नाही की, व्यवस्थित बोलत नाही. या रस्त्यावर दररोज अपघात होतात. त्याला जबाबदार कोण, त्यामुळे आता जसे तुम्ही चिकणे आहात, तसे रस्तेदेखील चिकणेे करून द्या.
– विक्रम रंधवे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना युवासेना, नाशिक