आमदार कांदेंच्या दबावाविरोधात संचालकांची पोलिसांकडे धाव
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीवरून नांदगाव तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात बाजार समितीच्या 9 प्रमुख संचालकांनी बंड पुकारले आहे.
आमदार कांदेंकडून राजकीय दबाव व प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले जाण्याची भीती व्यक्त करत, संचालकांनी थेट नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. आपल्यावर किंवा कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून तालुक्याबाहेरील अधिकार्यांमार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
बाजार समितीच्या 2023 मधील निवडणुकीत आमदार कांदे यांच्या पॅनलचा पराभव करून हे संचालक निवडून आले आहेत. 10 जुलै 2026 रोजी विद्यमान सभापती माजी आमदार संजय सयाजी पवार यांनी राजीनामा दिल्याने, 27 जुलै रोजी नवीन सभापतींची निवडणूक होणार आहे. समीर भुजबळ, दीपक गोगड आणि गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नवीन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून, सध्या या गटाकडे स्पष्ट बहुमत आहे.
बहुमत असलेल्या संचालकांना आपल्याकडे वळवण्यासाठी आमदार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप पत्रात केला आहे. माजी आमदार संजय पवार, डॉ. पुंजाराम आहेर, गणेश धात्रक यांच्यासह 9 संचालकांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात तक्रारींची सत्यता तपासल्याशिवाय मनमाड व नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये आणि चौकशीसाठी तालुक्याबाहेरील अधिकार्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. या अर्जावर कैलास भाबड, विठ्ठल आहेर, सुभाष उगले, योगेश कदम, आनंदा मार्कंड व संगीता कराड यांच्या स्वाक्षर्या आहेत. तालुक्यात विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू असल्याचा आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री या प्रकरणात लक्ष घालतील का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या सत्तासंघर्षामुळे नाशिक जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास?
नांदगाव तालुक्यातील सत्ताधारी गटाकडून जे विरोधात काम करतात व जे त्यांच्याकडे येण्यास तयार नाही, अशा नागरिकांवर अनेक प्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू आहे. यास मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे यांनी प्रत्युत्तर देत एका व्यक्तीच्या घरी गांजा टाकून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, विजय करे यांनी याबाबत सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांना अटक केले. मात्र, सर्वच अधिकारी करे यांच्यासारखे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणेवरून सर्वसामान्य जनतेचा अविश्वास असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री नांदगाव तालुक्याला यातून मुक्त करतील का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
Power struggle over the election of Manmad Market Committee Chairman