मुंजाबा चौकात दगडफेक, पाच जणांवर गुन्हा
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार फरशी व दगडांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला डोक्यात दगड लागून गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच जणांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व संशयित फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश ज्ञानेश्वर मोरे (वय 20, रा. फुलेनगर, पंचवटी) हा बुधवारी (दि. 15) रात्री सुमारे 10.15 वाजता घराशेजारील म्हसोबा मंदिराजवळ रिक्षात बसलेला असताना कार्तिक गांगुर्डे व पीयूष जाधव उर्फ तील्या हे तेथे आले. जुन्या वादातून त्यांनी नीलेशला धमकावत त्याच्या दिशेने धारदार फरशी आणि दगड फेकले. नीलेशने प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला.
यानंतर जय खरात, सोनू तायडे, मोगली शेवाळे, यश जाधव उर्फ तुंड्या तसेच त्यांच्या साथीदारांनीही परिसरात दगड, विटा आणि फरशांची फेकाफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. या गोंधळात उमेश चंद्रकांत भालेराव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या कपाळावर व डोक्यात दगड लागून ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी जय खरात, कार्तिक गांगुर्डे, पीयूष जाधव उर्फ तील्या, सोनू तायडे, मोगली शेवाळे तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित फरार असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.
Attempted deadly attack stemming from past enmity