राजीनाम्यावरून प्रवीण तिदमे यांची माघार

उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर आज मांडणार बाजू

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी डावलल्याने नाराज झालेले शिंदेसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी राजीनामा देणार असल्याची भूमिका शुक्रवारी (दि.6) जाहीर केल्याने पक्षात खळबळ उडाली होती. तिदमे यांचे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी गेल्यानंतर ना. शिंदे यांनी आपल्याशी चर्चा करून आपले गैरसमज दूर केले आहेत. तसेच याप्रकरणी आज, मंगळवारी (दि.10) ना. शिंदे यांच्या दरबारी आपल्याबाबत जे घडले ते मांडणार आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याची माहिती नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस नगरसेवक भागवत आरोटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका सुवर्णा मटाले, हर्षदा गायकर, डॉ. पूनम महाले, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेनेचे विस्तारक योगेश बेलदार, दिव्यांग सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश वाणी, शिवसेना झोपडपट्टी सेलचे जिल्हाप्रमुख भिवानंद काळे, महानगरप्रमुख सनी रोकडे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुलोचना मोहिते, नाशिक मध्यचे शिवसेना उपमहानगरप्रमुख अ‍ॅड. अक्षय कलंत्री आदी होते.
तिदमे पुढे म्हणाले, की मी नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो. उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी, समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या. सतत फोनवर आणि घरी गर्दी करून प्रत्येक जण हेच विचारात होते की, आपले काय चुकले?, आपण कुठे कमी पडलो? सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी नॉट रिचेबल झालो होतो. माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी, बंटीवर अन्याय होणार नाही. त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा निरोप कुटुंबीयांना दिला. या काळात विविध पक्षांतील पदाधिकारी, नागरिकांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रविवारी (दि.8) व सोमवारी (दि. 9) सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, आ. सुहास कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर, संपर्कप्रमुख राम रेपाळे आणि वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी फोनवर संपर्क झाला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होतो., त्यामुळे उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठविण्यात आले नाही. तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस, असे स्पष्ट आदेश दिले. तुझ्यावर आणि अन्य नगरसेवकांवर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट त्यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे यांचा आदेश आणि जनभावनेचा आदर करत मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिदमे यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत राजीनामा देऊ नका, अशा मागणीचे पत्र तांबोळी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष अझीझ तांबोळी आणि समाज बांधवांनी प्रवीण तिदमे यांना दिले. पंचवटी विभागाचे उपमहानगरप्रमुख प्रवीण काकड, अभिषेक बोरस्ते, अमोल महाले, अमोल नाईक, उपमहानगर संघटक अ‍ॅॅड. अजिंक्य गिते, शिवसेना कार्यालयीन प्रमुख शरद नामपूरकर, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख बाळकृष्ण सूर्यवंशी, आकाश पवार, जीवन दिघोळे, युवासेनेचे नयन शेजवळ, शिवसेना विभागप्रमुख अमित मांडवे, सागर जाधव, सागर मोटकरी, सुयश पाटील, आकाश साळवे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रावण पवार, आकाश कोकाटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

पक्षांतर्गत आतापासूनच संघर्ष

दरम्यान, 26 जागा मिळविलेल्या शिंदेसेनेत आतापासून पदासाठी अंतर्गत संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. प्रारंभी गटनेतेपदी अजय बोरस्ते यांंची नियुक्ती झाली, तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांना संधी दिली गेली. यावरून मात्र जे आधीपासून पक्षात होते, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काही नगरसेवकांची आहे. त्यावरूनच प्रवीण तिदमे नाराज झाले होते. दरम्यान, उपमहापौर व गटनेतेपद या पदाचा कार्यकाळ ठरवून इतरांना संधी देण्याची मागणी नगरसेवकांनी सुरू केली आहे. यासह स्थायी समिती सदस्यांचीदेखील नियुक्ती केली जाणार असून, यासाठी कुणाला संधी दिली जाणार? हे लवकरच समजणार आहे. परंतु शिंदेसेनेत आतापासूनच पक्षांतर्गत गटबाजीला सुरुवात झाल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

उपमहापौर, गटनेतेपदावरून राजकारण पेटले

उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा आणि गटनेतेपदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला वापरून सर्वांना न्याय देण्याची मागणी आम्ही पक्षाकडे मांडणार आहोत, असे नगरसेविका हर्षदा गायकर यांनी सांगितले. नगरसेवक भागवत आरोटे यांनीही सर्वांचा सन्मान राखला जावा आणि स्थानिक पातळीवर विश्वासात घेऊन निर्णय व्हावेत, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

Praveen Tidme withdraws resignation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *