राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्या धर्मध्वजारोहण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यासाठी मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजही सज्ज झाले आहेत. येत्या 31 ऑक्टोबर रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने ध्वजांची विशिष्ट मापे, पारंपरिक सजावट आणि धार्मिक महत्त्व यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्य धर्मध्वजाची आडवी लांबी 15.5 फूट, तर उभी लांबी पाच फूट आहे. या ध्वजाला चारही बाजूंनी तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. ध्वजाच्या खालच्या बाजूस 15 घंटा, 12 रेशमी गोंडे आणि तीन घुंगरू लावण्यात आले आहेत. सुवर्ण रंगाची जरी आणि पारंपरिक सजावटीच्या घटकांमुळे मुख्य धर्मध्वजाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ध्वजाची आडवी लांबी नऊ फूट, तर उभी लांबी पाच फूट आहे. मुख्य धर्मध्वजाप्रमाणेच या ध्वजालाही चारही बाजूंनी तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. या ध्वजाच्या खालच्या बाजूस नऊ घंटा, सहा रेशमी गोंडे आणि तीन घुंगरू लावण्यात आले आहेत. दोन्ही ध्वजांच्या आकारमानानुसार त्यांच्या सजावटीचे नियोजन करण्यात आले आहे.
या ध्वजांची मापे, रचना आणि सजावटीसंदर्भातील माहिती गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, प्रतीक शुक्ल आणि दिलीप शुक्ल, तसेच ध्वज तयार करणारे दुर्गेश खैरनार यांनी दिली.
दि. 31 ऑक्टोबर रोजी होणार्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य धर्मध्वज आणि गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वज तयार झाले आहे. या सोहळ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
Preparations for the hoisting of the religious flag in the city are complete.