सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 अंतर्गत विविध मालमत्तांविरुद्धच्या गुन्ह्यांतील तब्बल 1 कोटी 36 लाख 25 हजार 976 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना मंगळवारी परत करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोन्याचे दागिने, स्त्रीधन, वाहने, मोबाइल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य लाभार्थ्यांच्या स्वाधीन
करण्यात आले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांमधील जप्त मालमत्ता शक्य तितक्या लवकर मूळ मालकांना परत देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत यांनी परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांना मुद्देमाल विल्हेवाट प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकरणांतील मुद्देमाल फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आला.
या उपक्रमात आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांचा समावेश होता. एकूण 302.775 ग्रॅम सोन्याचे दागिने, स्त्रीधन, 51 दुचाकी, नऊ चारचाकी वाहने, 26 मोबाइल फोन, तीन लॅपटॉप, एक एसी कॉम्प्रेसर, एक जेबीएल साउंड सिस्टिम तसेच 1 लाख 44 हजार 860 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. हरवलेले किंवा चोरीस गेलेले दागिने, स्त्रीधन आणि उपजीविकेसाठी आवश्यक वाहने पुन्हा मिळाल्याने अनेक फिर्यादींनी समाधान व्यक्त केले. विशेषतः महिलांनी स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमधील मुद्देमालाचा शोध घेऊन तो न्यायालयीन प्रक्रियेनंतर तातडीने फिर्यादींना परत देण्याची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहील, असे पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले. तसेच ही मोहीम यशस्वीपणे राबविणार्या सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी आणि कर्मचार्यांचे त्यांनी कौतुक केले.
Property worth ₹1.36 crore, recovered in cases from Zone-1, returned to complainants.