चोरटे सीसीटीव्हीत कैद; श्वानपथक पाचारण
वणी : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र करंजी येथे चोरट्यांच्या टोळीकडून धाडसी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीक्षेत्र करंजी हे दत्तात्रेयांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. येथील कर्दमाश्रमात बुधवारी मध्यरात्रीनंतर मंदिराचा मुख्य दरवाजाच्या शटरचे कुलूप तोडून, फ्रेम वाकवून व काच काढून मंदिर गाभार्यात दत्त महाराजांच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन अंदाजे वजन 1 तोळे (किंमत एक लाख रुपये), गाभार्यातील दत्त महाराजांचे चांदीचे मुकुट (20 हजार रुपये), तीन दानपेट्यातील भक्ताचं देणगीचे अंदाजे दोन लाख रुपयांची रोकड, चांदीची गणेशमूर्ती (एक लाख रुपये), 10 भार वजनाची चांदीची गणपती मूर्ती (20 हजार रुपये), दत्त महाराजांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट अंदाजे 10 भार वजनाचे (20 हजार रुपये), पितळाच्या लहान-मोठ्या 11 मूर्ती (15 हजार रुपये) असा एकूण चार लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, चोरांनी रुमाल व कपड्यांनी चेहरा झाकला असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान, सदरची घटना सकाळी मंदिराचे पुजारी व भाविक मंदिरात आल्यानंतर उघडकीस आली. याबाबत माहिती पोलिसांना कळवल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञास पाचारण केेेले होते. दरम्यान, पोलिसांनी शशिकांत देवराम सवंद्रे (वय 64, रा. करंजी, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे तपास करीत आहेत.
Property worth over four lakhs looted from Kardamashram in Karanji