कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे तब्बल 75 लाख तर नाशिकमध्ये एक कोटी भाविक येण्याचा अंदाज असून, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास त्र्यंबकेश्वर मंदिर काही काळ बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.
साठ दिवसांच्या कुंभकाळात त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे चार कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत मंदिराची दर्शनक्षमता अत्यंत मर्यादित असल्याने सर्व भाविकांना प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि मंदिर परिसरावरील ताण लक्षात घेऊन परिस्थितीनुसार कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असे सिंग म्हणाले.
यंदाच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे दीड लाख भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीचे नियोजन करताना प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची मोठी कसोटी लागली. सिंहस्थाच्या मुख्य पर्वणीला यापेक्षा अनेक पटीने गर्दी होणार असल्याने आतापासूनच मंदिर परिसर आणि शहरातील गर्दीचे विभाजन करण्यावर भर दिला जात आहे.
मुख्य पर्वणीच्या काळात गर्दीचा ताण वाढत गेला आणि भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर मंदिर प्रवेशावर तात्पुरती मर्यादा आणण्याबरोबरच मंदिर बंद ठेवण्याचाही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार असून, भाविकांची सुरक्षितता हा त्यामागील प्रमुख निकष असेल.
नाशिक, त्र्यंबकला नवीन घाट
कुशावर्त तीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांना नवीन घाटांवर स्नान करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. कुशावर्ताला प्रवेश देण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी काही निर्बंध लागू केले जातील, तर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आवश्यक ते रिलॅक्सेशनही दिले जाईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
कामे जुलैपर्यंत पूर्ण होणार
सिंहस्थाची कामे जुलैपर्यंत पूर्ण होतील, हे सांगताना शेखर सिंह म्हणाले सध्या नाशिककरांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, जी कामे होणार आहेत, त्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे. ही कामे जुलैपर्यंत पूर्ण होतील. रिंगरोडच्या बाबतीत काही जमिनींचे संपादन झाले आहे. रिंगरोड झाल्यास त्याचा सिंहस्थानंतरही नाशिककरांना मोठा फायदा होणार आहे.
दर्शनाची क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न
मंदिर परिसर आणि दर्शनपथाच्या आजूबाजूची उपलब्ध जागा वाढविण्याचे काम नियोजनाच्या टप्प्यात आहे. भाविकांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबावे लागू नये, यासाठी दर्शनपथाचा विस्तार, स्वतंत्र मार्गिका आणि कॅरिडॉरची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या 24 तासांत 16 हजार भाविकांना दर्शन मिळते. दर्शनपथाच्या विस्तारानंतर ही क्षमता 32 हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, मुख्य पर्वणीच्या दिवशी 75 लाख भाविक अपेक्षित असल्याने या माध्यमातूनही सर्वांना दर्शन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नियोजित मार्गांचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे.
Proposal to keep Trimbak temple closed on the auspicious day if the crowd becomes excessive.