जिल्ह्यात हिवताप प्रतिरोधसाठी जनजागृती

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी कुठलाही ताप अंगावर न काढता त्वरित रक्ताची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येतो. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांमध्ये प्रामुख्याने हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या, हत्तीरोग या आजारांचा समावेश होतो. हिवताप या आजाराची लागण झाल्यावर थंडी, ताप, अंगदुखी अशा प्रकाराची लक्षणे दिसून येतात. तसेच डेंगी व चिकुनगुन्या या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे अशा प्रकाराची लक्षणे दिसतात. अशा वेळी रुग्णाला ताप आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित रक्ताची तपासणी करून वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. या आजारासाठीच्या शासकीय रुग्णालयात मोफत तपासण्या करण्यात येणार असून रुग्णात लक्षणे असल्याचे आढळल्यास त्यासाठी औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात जलद ताप सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थान शोधून त्यामध्ये गप्पी मासे टाकणे, आशा कर्मचार्‍यांच्या मार्फत कार्यक्षेत्रात कामकाज करून घेणे, हस्तपत्रिका वाटप करणे, मच्छरदाणी वापर करण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे, गटारी वाहत्या करणे, परिसर स्वच्छता करणे, स्वच्छतागृहाच्या व्हेंट पाइपला जाळ्या लावणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाण्याचे साठे झाकून ठेवणे, वेळोवेळी ग्रामसभा-गटसभा घेऊन कीटकजन्य आजाराबाबत माहिती देणे आदी उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *