पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. मानवी जीवनापासून शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या संतुलनापर्यंत प्रत्येक गोष्ट पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, वाढती लोकसंख्या, अनियमित पाऊस, भूजलपातळीत होणारी घट, पाण्याचा अमर्याद वापर आणि जलस्रोतांचे प्रदूषण यामुळे पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
अशा परिस्थितीत जलसंधारण ही केवळ शासकीय योजना न राहता ती लोकचळवळ होणे काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या कोणत्याही उपक्रमाला यशस्वी करायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही जलसंधारणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मात्र, केवळ शासनाने बंधारे बांधले, तलाव खोदले किंवा जलयुक्त कामे केली म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. या कामांची देखभाल, संवर्धन आणि योग्य वापर करण्यासाठी स्थानिक नागरिकांची सक्रिय भूमिका आवश्यक आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने जलसंधारणाची जबाबदारी स्वीकारली, तरच पाण्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना शक्य होऊ शकतात. महाराष्ट्रातील अनेक भागांना दरवर्षी दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
काही ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले असतानाही योग्य नियोजनाअभावी पाणी वाहून जाते. दुसरीकडे, भूजलाचा अतिवापर केल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावपातळीवर जलसंधारणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील नाले, ओढे, तलाव, विहिरी आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या चळवळीत ग्रामपंचायत, शेतकरी, महिला बचतगट, युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरू शकतो. गावातील पाण्याचा ताळेबंद तयार करणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, वृक्षारोपण करणे, शेततळी उभारणे, बांधबंदिस्ती करणे, नाला खोलीकरण आणि गाळ काढण्यासारखी कामे लोकसहभागातून प्रभावीपणे करता येऊ शकतात. श्रमदानातून होणारी कामे ही केवळ जलसाठा वाढविणारी नसतात, तर गावातील एकजूट आणि सामाजिक बांधिलकीही मजबूत करतात.विशेषतः शेतकर्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या पाणीबचतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, पिकांच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन आणि कमी पाण्यात येणार्या पिकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पाण्याचा वापर करताना आजची गरज आणि उद्याची उपलब्धता यांचा विचार झाला पाहिजे. भूजलाचा उपसा करण्याबरोबरच त्याचे पुनर्भरण करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. जलसंधारणाच्या चळवळीत महिलांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन, पाणीवापराचे नियम आणि जलस्रोतांच्या देखभालीमध्ये महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्व समाजमाध्यमे, जनजागृती फेर्या आणि प्रत्यक्ष श्रमदानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावे.
केवळ पावसाळ्यात जलसंधारणाची आठवण करून उपयोग नाही. वर्षभर जलस्रोतांची देखभाल, पाण्याचा काटकसरीने वापर आणि भूजल पुनर्भरण यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अनेकदा जलसंधारणाची कामे केवळ सरकारी अनुदान किंवा प्रसिद्धीपुरती मर्यादित राहतात. कामांचा दर्जा, पारदर्शकता आणि त्यातून निर्माण होणारा प्रत्यक्ष जलसाठा यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. लोकसहभागाबरोबरच प्रशासनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. आज हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित झाले आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी दीर्घकाळ पावसाचा खंड, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
Public participation is crucial for the water conservation movement.
- अश्विनी पांडे शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन…
- गोरख काळे बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत…
दि. 22 ते 28 नोव्हेंबर 2026 मेष : यश मिळेल हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक…
गंगापूर रोडवर वाहने चालवणार्यांची पंचाईत नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे रूप पालटत…
गर्डरच्या कामासाठी पिंपळगाव बहुला पूल चार दिवस बंद नाशिक : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर मार्गावरील पिंपळगाव बहुला…