पुलवामा एन्काउंटर

भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. दहशतवादी संघटनांची अनेक ठिकाणे पाकिस्तानात आहेत. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांनी भारतात अनेक कारवाया केलेल्या आहेत. दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानातच दहशतवाद्याची हत्या होणे, ही आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. सन 2019 साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलिस दलाचे (सीआरपीएफ) म्हणजे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा आत्मघाती हल्ल्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा दहशतवादी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुरुवारी, 21 मे 2026 रोजी अज्ञात बंदूकधार्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांना धक्का देणारी ही गोष्ट असली, तरी या हत्येमागे पाकिस्तान सरकारचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आता बोलले जात आहे. सुमारे 40 सीआरपीएफ जवानांचा बळी घेणार्‍या अत्यंत भीषण अशा 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि अल बद्र या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कमांडर हमजा बुरहान ऊर्फ डॉक्टर याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात बंदूकधार्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे त्याची हत्या करण्यात आली. अनेक गोळ्या लागल्यामुळे बुरहानचा जागीच मृत्यू झाला. मूळचा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला 23 वर्षीय अर्जुमंद गुलजार दार ऊर्फ हमजा बुरहान 2017 मध्ये उच्च शिक्षणाच्या बहाण्याने पाकिस्तानात गेला होता. तिथे गेल्यावर तो अल बद्र या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. अल्पावधीतच त्याने आपल्या क्रूर कारवायांमुळे कमांडर पदापर्यंत मजल मारली. भारत सरकारने 2022 मध्ये बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याला अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी तो एक मानला जात होता. पुलवामा आत्मघाती दहशतवादी हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथपोरा (पुलवामा) येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या बसवर धडकवली होती. या भीषण हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. बुरहानने या हल्ल्यासाठी ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून काम केले होते आणि हल्लेखोरांना स्फोटके व ग्रेनेड पुरवले होते. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ले करून जैशचे तळ उद्ध्वस्त केले होते. मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या बुरहानची हत्या कशी काय झाली, हा मोठा प्रश्न आहे. त्याचा एन्काउंटर करण्यात आला तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कटकारस्थाने रचण्यात पाकिस्तान हा अत्यंत कुशल आहे. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमध्ये फंडिंग (पैसा) आणि वर्चस्वावरून मोठे अंतर्गत वाद सुरू आहेत. दहशतवादासाठी मिळणार्‍या पैशांच्या वाटपावरून झालेल्या वादातून त्याच्याच प्रतिस्पर्धी टोळीने किंवा इतर दहशतवाद्यांनी त्याची हत्या घडवून आणली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हमजा बुरहान हा एका खासगी कॉलेजबाहेर उभा असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. पुलवामा हल्ल्यानंतर हमजा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या संरक्षणात एका खासगी कॉलेजचा प्रिन्सिपल (प्राचार्य) बनून खोट्या ओळखीने राहत होता; परंतु तो तिथूनच काश्मीरमध्ये शस्त्रे, ड्रग्ज पाठवणे आणि तरुणांची भरती करण्याचे नेटवर्क चालवत होता. त्याची खरी ओळख आणि ठिकाण उघड झाल्यामुळेच त्याला अचूक टार्गेट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक लोकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही सांगितले जात आहे. मुळात बुरहानची हत्या का झाली? हा प्रश्न असला, तरी स्थानिक लोकांनी बंदूकधार्‍यांना कसे काय पकडून दिले किंवा त्यांना पकडण्याचे धाडस कसे केले, असेही प्रश्न उपस्थित होतात. हत्या कोणी केली, का केली, याचे तपशील जाहीर झाले नसले, तरी बुरहानने केलेल्या पुलवामा गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली आहे, असे आपण म्हणू शकतो. त्याची हत्या झाल्याने आपण सुरक्षित नसल्याचा संदेश इतर दहशतवाद्यांनाही मिळाला असेल, त्याच्या हत्येने पुलवामा घटनेचा न्याय झाला, असेही म्हटले जाऊ शकते. मात्र, बुरहानला पाकिस्तानने संपविले असण्याची शक्यता तितकीच व्यक्त केली जात असेल तर? हमजा बुरहानच्या हत्येनंतर त्याच्या अंत्यसंस्काराला (नमाज-ए-जनाजा) पाकिस्तानचे आयएसआय अधिकारी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनसारखे मोस्ट वाँटेड दहशतवादी मोठ्या सुरक्षेत उपस्थित होते. त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याला संरक्षण देत होते, असे चित्र दिसते. तथापि, आंतरराष्ट्रीय दबाव टाळण्यासाठी किंवा जुने झालेले मोहरे संपवण्यासाठी आयएसआय अशा कारवाया करू शकते, असा एक मतप्रवाह आहे. बुरहानच्या हत्येची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. दहशतवादी संघटनांना पैसा देणे आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबाव आहे. अशा वेळी भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील दहशतवाद्यांना अज्ञात बंदूकधार्‍यांमार्फत संपवून स्वतःचा हात झटकणे, ही पाकिस्तानची जुनी रणनीती असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे. जेव्हा एखादा दहशतवादी पाकिस्तानसाठी निरुपयोगी होतो किंवा डोकेदुखी ठरतो, तेव्हा आयएसआय स्वतःच गुप्तपणे त्याचा काटा काढते, असेही सांगितले जाते. त्याच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातील आयएसआयने पाळलेले गुंड दहशतवादीही सुरक्षित नसल्याची भावना आता तेथे पसरली असेल. संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानची टेरर फॅक्टरी अशी संभावना केली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हमजा बुरहानची हत्या झाली. दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानची भूमिका कठोर झाली आहे, हे दाखवण्याचा तर प्रयत्न यामागे नाही ना? हमजाकडे अत्यंत गोपनीय माहिती असावी, त्याला पाकिस्तानबाहेर कुठेतरी पकडले गेले असते आणि त्याने चौकशीत सर्व माहिती उघड केली असती, तर पाकिस्तान आणि आयएसआयची नाचक्की झाली असती, हे लक्षात घेतले गेले पाहिजे. हमजा बुरहान याच्या हत्येमागे कोण आहे आणि कोणत्या कारणाने त्याची हत्या झाली, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचा एन्काउंटर करण्यात आल्याची शक्यता तितकीच आहे.

Pulwama Encounter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *