ज्योत्स्ना डगळे
समुपदेशनाच्या वेळी कित्येक मुलं आमच्या पुढे त्यांच्या आयुष्यातले सर्व सांगतात, पण माझ्या आई-बाबाला यातले काही माहीत होता कामा नये. असे का बरे वागतात मुलं? खरंच त्यांना लपवावेसे वाटते का आईबाबांपासून?
आजच मी नवीन एक जाहिरात पाहिली. विशेष वाटली. आधी तर समजलेच नाही की जाहिरात नेमकी कसली आहे ते. मोठे मॉल आणि त्यामध्ये येणार्या प्रत्येक गिर्हाईकाला एक साईज न् एकाच रंगाचे शर्ट आणि प्रत्येक जण हैराण हे नेमकं काय सुरू आहे. त्यावेळी एंट्री होते ती मॅनेजरची! मॅनेजर पाहून पुन्हा वेगळी चक्रे. ही लहान मुले कशी मॅनेजर असणार?त्यावेळी आपली खरी चूक कळते. बरोबरच आहे ना, एक साईज न् एकाच रंगाचे शर्ट प्रत्येकालाच नाही येऊ शकत किंवा प्रत्येकाची आवड तीच नाही असू शकत. प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येकात वेगळी प्रतिभा आहे. जन्मजात प्रतिभा. जी तो जन्माला येतानाच घेऊन आला आहे. मग ती नाकारणे म्हणजे साक्षात त्याच्या मर्जीला नाकारणे असे नाही का?
का आपण आपली राहिलेली स्वप्नं आपल्या मुलांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षा करतो? का? त्यांच्यात असलेले खरे टॅलेंट आपण कधी शोधणार? आपण सर्वजण ना एक बॉक्स जगत आहोत. सकाळी बेडरूम नामक बॉक्समधून उठतो. नंतर वॉशरूम नामक बॉक्समधून फ्रेश होतो. नंतर कार, बस, टॅक्सी नामक बॉक्समधून ऑफिसला जातो. तिथे कॉम्प्युटर नावाच्या बॉक्ससमोर बसून दिवसभर काम करतो. नंतर पुन्हा ऑफिस सुटल्यावर घर नावाच्या बॉक्समध्ये येतो. तिथे हॉल नावाच्या बॉक्समध्ये बसून टीव्ही नावाचा बॉक्स रिमोट हातात घेऊन दोन ते तीन तास बघतो. त्यानंतर डायनिंग टेबलच्या बॉक्सवर जाऊन जेवण करतो. मग वेळ येते ती बेडरूम नामक बॉक्समध्ये जाण्याची. तिथेही आपण मोबाइल नामक बॉक्स घेऊन तास दोन घालवतो. झोपतो. रुटीन सकाळी पुन्हा तेच.
विचार करण्याची गोष्ट आहे, आपण स्वत: एका बॉक्स लाइफमध्ये जगतो आहे, जिथे मुलांना द्यायला आपल्यालाच वेळ नाही. मुलांना चांगल्या शाळेत घातले, चांगले कोचिंग लावून दिले लावून म्हणजे संपले का हो? जी स्वप्नं तुम्ही मुलांकडे पूर्ण व्हावे असे पाहतात ती स्वप्नं तुम्ही स्वत: कधी उघड्या डोळ्यांनी कधी पाहिलीत का? नाही ना.. मग काहीच अधिकार नाही आपल्याला त्यांच्या स्वप्नांचा गळा आवळायचा. त्यांच्याकडे जे चांगले आहे ते बघा, त्या प्रतिभेला बाहेर यायला वाव द्या. प्रत्येक मुलामध्ये लपलेले टॅलेंट हे एका स्प्रिंगसारखे असते. जेवढे दाबून ठेवाल तेवढ्याच जोराने ते बाहेर उडणार आहे. मग ते निगेटिव्ह एनर्जीने किंवा पॉझिटिव्ह एनर्जीने. ठरवायचंय तुम्हाला, ती प्रतिभा, ते दाबून ठेवत सतत आपल्या पाल्याचे निगेटिव्ह पॉइंटच पाहायचे की त्याला त्याच्या आवडीचे करियर निवडायचे.
कित्येक लोकांनी आपले करिअरचे ट्रॅक अगदी शेवटच्या टोकाला असतानाही बदलले आहेत. त्यांना तिथे यश मिळाले पण आनंद गमावून बसले. आनंद हा कधीच ओढून ताणून आणला जाऊ शकत नाही. तो निखळ असतो. तो शोधता आला पाहिजे. आपले मूल आपल्या काळजाचा तुकडा असतो. त्याला हवे ते आणून देणे म्हणजेच प्रेम नव्हे. तुमच्या वागण्या-बोलण्यातून ते झळकले पाहिजे. प्रत्येक मुलासाठी त्याचे आई-वडील त्याचे सर्वस्व असतात. मग का आपणच त्यांचे दुश्मन होऊन बसतो. मुळात आपण ज्या मडक्यावर रंगरंगोटी करायला निघालो आहोत ते मडके मुळातच पक्के आहे का? याची आपण शहानिशा करतो का?
समुपदेशनाच्या वेळी कित्येक मुलं आमच्या पुढे त्यांच्या आयुष्यातले सर्व सांगतात, पण माझ्या आई-बाबाला यातले काही माहीत होता कामा नये. असे का बरे वागतात मुलं? खरंच त्याना लपवावेसे वाटते का आई-बाबांपासून? लहानपणी पाटीवर चिरखोड्या ओढल्यावरही पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप हळूहळू कमी होत जाते. जे मुलं दुडूदुडू आई-बाबांच्या मागे धावून दिवसभराचा मागोवा सांगत असत त्याच मुलाचे आई-बाबा ते मुलं मोठं झाल्यावर त्याच्या मागे केविलपणे धावत सुटतात. बेटा सांग ना आज दिवसभरात काय झाले ते? खरंच आपली स्वप्नं मुलांवर लादणे योग्य आहे? तुम्ही आई-बाबा म्हणून जर त्यांना तुमचा क्वालिटी टाइम नाही देऊ शकत तर तुम्हाला काही एक अधिकार नाही त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवण्याच्या! वेळ आली आहे ती स्वत: अंतर्मुख होण्याची. स्वत:ची जबाबदारी ओळखण्याची.
हे ही वाचा :
- महिला आरक्षणाची मंगळवारी सोडत
- महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा