तरुण

पाऊस असाही तसाही

पाऊस म्हणजे फक्त आकाशातून कोसळणारे थेंब नव्हेत; तो निसर्गाने लिहिलेलं एक भावगीत आहे. मातीच्या सुगंधात मिसळलेली आठवण, वाफाळत्या चहाच्या घोटात दडलेली ऊब, नकळत ओठांवर येणारं एखादं जुनं प्रेमगीत आणि मनाच्या कोपर्‍यात पुन्हा जागं होणारं बालपण हे सगळं पावसाच्या सरींसोबत अलगद बरसत राहतं. तो प्रेमाला शब्द देतो, कवितेला अर्थ देतो आणि कोरड्या मनालाही हिरवाईची नवी पालवी
फुटवतो. म्हणूनच प्रत्येकासाठी पाऊस म्हणजे एक वेगळी कहाणी असते. तो कवीच्या लेखणीतून कविता बनतो, चित्रकाराच्या कुंचल्यातून रंग बनतो आणि प्रेमिकांच्या डोळ्यांतून स्वप्न बनून बरसतो.
ढग दाटून आले की, शेतकरी आशेने आकाशाकडे पाहतो. पहिल्या सरींसोबत मातीचा दरवळ दरवळतो, शिवार हिरव्या रंगाने नटतं आणि त्या प्रत्येक थेंबात उद्याचं स्वप्न उमलतं. कोरड्या मातीतून डोकावणारा पहिला अंकुर म्हणजे जणू जीवनाने दिलेला नवा श्वास. म्हणूनच पाऊस हा प्रेमाचा, आशेचा आणि नवजीवनाचा उत्सव वाटतो.
…पण निसर्गाचं हेच रूप कधी भयावह होतं, ते कळतही नाही.
जेव्हा पाऊस थांबायचं विसरतो, तेव्हा त्याच सरी आनंदा ऐवजी आक्रोश बनून बरसतात. ज्या पावसावर आपण कविता लिहितो, तोच एखाद्या गरीबाच्या झोपडीचं छप्पर गळायला लावतो. रात्रभर लेकरांना कुशीत घेऊन बसलेली आई प्रत्येक थेंबासोबत उद्याच्या काळजीची गणितं मांडत असते. एका बाजूला गरम भजी आणि चहाचा आस्वाद घेतला जातो, तर दुसर्‍या बाजूला कोणाच्यातरी चूल त्या दिवशी पेटतही नाही.
ज्या सरींनी शेतकर्‍याच्या डोळ्यांत आशेचं स्वप्न फुलवलं होतं, त्याच सरी अतिरेकी झाल्या की उभं पीक क्षणात चिखलात मिसळतं. वर्षभराचा घाम, कष्ट आणि अपेक्षा एका पुराच्या लाटेसोबत वाहून जातात. आणि जेव्हा नद्या त्यांच्या मर्यादा ओलांडतात, तेव्हा त्या फक्त पाणी आणत नाहीत; त्या कोणाचं घर, कोणाचं बालपण, कोणाचं कुटुंब आणि अनेकांचं संपूर्ण आयुष्यच सोबत घेऊन जातात.
तेव्हा जाणवतं दोष पावसाचा नसतो. तो तर सारखाच बरसत असतो; बदलतात ते फक्त त्याचे अर्थ. कोणासाठी तो प्रेमाची कविता असतो, कोणासाठी जगण्याची आशा, तर कोणासाठी नियतीने लिहिलेलं सर्वांत वेदनादायी प्रकरण.
म्हणूनच पावसाकडे पाहताना त्याच्या सौंदर्याबरोबर त्याच्या वेदनाही पाहायला शिकायला हवं. आपल्या घराच्या गच्चीवर उभं राहून पावसाचा आनंद घेत असताना कुठेतरी एखादं छप्पर गळत असेल; आपण गरम चहाचा घोट घेत असताना कुणाची चूल विझली असेल आणि आपण हिरवाईचं सौंदर्य न्याहाळत असताना कुणाचं आयुष्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं असेल.
पाऊस आपल्याला प्रेम शिकवतो, पण त्याचबरोबर संवेदनाही शिकवतो. तो निसर्गावर प्रेम करायला शिकवतो, पण माणुसकी जपण्याची जबाबदारीही आपल्या खांद्यावर ठेवतो. म्हणूनच पावसाच्या प्रत्येक सरीसोबत जर आपल्या मनात करुणा, सहवेदना, कृतज्ञता आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची वृत्ती रुजली तरच पावसाचा खरा अर्थ
आपल्याला उमगेल.
कारण पाऊस कधी प्रेमपत्र बनून बरसतो, तर कधी अश्रूंचा पूर घेऊन येतो. आणि म्हणूनच पाऊस हा केवळ ऋतू नाही… तो निसर्गाने माणसाला दिलेला सर्वांत सुंदर आणि सर्वांत कठोर जीवनधडा आहे. आणि म्हणूनच पाऊस असाही आहे… आणि पाऊस तसाही आहे…

Rain, One Way or Another

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago