टोल-वेज् कंपनीचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड पूर्व भागातील गावांत शनिवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या मुसळधारेने तीस तासांत मोठा धुमाकूळ घातला. गाव परिसरातील अनेकांच्या घरांत पुराचे पाणी घुसल्याने संसार पाण्यात वाहून गेले. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांकडून होत आहे.
शनिवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने तब्बल 24 तास आपली तीव्रता दोन दिवस सारखीच ठेवल्याने अनेकांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले. मोटारसायकल असणार्या प्रवाशांचे पडणार्या पावसाने चांगलेच हाल केले. मालवाहतूक करणार्या चालकांनी अक्षरशः रस्त्याच्या कडेला आपली वाहने काही वेळेकरिता उभी केली होती. या पावसाने अनेकांचे हाल झाले.
पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, उड्डाणपूल, तसेच पळसे गावाजवळील पुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. महापालिका व टोल प्रशासनाने ठोस पावले उचलून पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी व उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
दुसर्या बाजूला सिन्नर फाटा, चेहेडी, पळसे व शिंदे गाव या लगत असणार्या रस्त्याला मोठमोेठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण होत आहे. नाशिक- सिन्नर टोल-वेज् कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. फुलेनगरकडून पळसे गावात जाणार्या सर्व्हिस रोडवर पुराचे पाणी आल्याने गावात येणारा रस्ता काही तासांसाठी बंद झाला होता.
यावेळी शिंदे मंडल अधिकारी भागीरथी सावळे, तलाठी केदार भदाणे, पोलीसपाटील सुनील गायधनी, माजी सभापती जगन्नाथ आगळे, कामगार नेते विष्णुपंत गायखे, सरपंच ताराबाई गायधनी, उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, अजित गायधनी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, उबाठा तालुकाप्रमुख दीपक गायधनी, समाधान गायखे, किरण चंद्रमोरे, कृषिमित्र संजय गायधनी, साहेबराव गायधनी, नंदू नरवाडे, शिवाजी गायधनी, संदीप गायखे, नमेश गायखे, ईश्वर गायखे, डॉ. संजय गायखे, संतोष गायधनी आदींसह ग्रामपालिका पदाधिकार्यांनी नुकसानाची पाहणी करत नुकसानग्रस्तांना सहकार्य केले.
या नागरिकांचे झाले नुकसान
गेले अकरा तास सुरू असलेल्या मुसळधारेमुळे अनेकांच्या घरांत नदी, नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शेतकरीवर्गासह रस्त्याच्या कडेला राहणार्या रहिवाशांची धावपळ उडाली. लक्ष्मण गायखे, जगन गायखे, रघुनाथ गायखे, नितीन ढेरिंगे, फुल्याबाई ढेरिंगे, वसंत ढेरिंगे यांच्या घरांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. सुधाकर गायधनी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके नष्ट झाली आहेत.
टोल-वे कंपनीवर कारवाईची मागणी
नाशिक-सिन्नर टोल-वेज् कंपनी प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महामार्गाचे काम झाल्यापासून रस्त्यावरील गावांना कोणतीही सुविधा तर नाहीच. उलट सर्व्हिस रोडचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे केले. आज हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे. संबंधित टोल-वेज् कंपनीवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे-पळसे येथील नागरिकांनी केली आहे.
नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…
दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…