महापौरांशी नमामि फाउंडेशनची चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वातावरण नियंत्रण ठेवण्याबरोबरच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरात रेन वॉटर
हार्वेस्टिंगला चाल दिली जाणार आहे. यासंदर्भात नमामि फाउंडेशनच्या सदस्यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापौरांनीदेखील या प्रस्तावास प्रतिसाद दिला.
यावेळी राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, प्राजक्ता बस्ते, डॉ. वृषणीत सौदागर यांनी महापौरांना निवेदन देत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. या प्रणालीमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवले जाईल, भूजलसाठा वाढेल. यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल, असे फाउंडेशनच्या सदस्यांनी म्हटले आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात कायमस्वरूपी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी याद्वारे पुढे आली आहे. नमामि गोदा फाउंडेशनच्या पदाधिकार्यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. महापौरांनी या संकल्पनेबाबत सकारात्मक भूमिका दर्शवत, अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्याचे संकेत दिले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बदलत्या हवामानामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. विशेषतः कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांच्या काळात पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन पावसाचे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करण्याची प्रणाली शहरात व्यापक प्रमाणावर राबविणे गरजेचे असल्याचे नमामि गोदा फाउंडेशनने म्हटले. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीमुळे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवता येते. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होते. विहिरी, कूपनलिका यांमधील पाणीसाठा टिकून राहतो. पावसाच्या पाण्याचा अपव्यय कमी होऊन शहराच्या एकूण जलव्यवस्थापनात सुधारणा होते.
या शहरांत प्रयोग
देशातील बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई तसेच मुंबई व पुणे या शहरांत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे राबविल्यास पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शहराच्या भविष्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून याकडे पाहण्याची गरज आहे. प्रशासनाच्या माध्यमातून यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून पुढील कार्यवाही केली जाईल
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर