‘नकोशी’च्या जन्मदरात सुधारणा!

महापालिका क्षेत्रात हजार मुलांमागे 909 मुलींचे प्रमाण

नाशिक : प्रतिनिधी
वंशाला दिवाच हवा, या बुरसटलेल्या मानसिकतेत समाजात आता बदल होताना दिसतो आहे. मुलगा व मुलगीत कुठलाही भेद नाही, ही भावना कुठेतरी रुजताना दिसतेय. नाशिक महापालिका क्षेत्रात एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत नकोशी हवी वाटू लागल्याचे चित्र आहे. या वर्षभरात हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 909 राहिला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या मागील वर्षी मुलींचा जन्मदर 884 होता.
दरम्यान, गर्भलिंगनिदान कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या जनजागृतीच्या प्रयत्नांना काहीसे यश मिळू लागले आहे. मुलगाच हवा याबाबतची मानसिकता मागे पडून जन्माला येणार्‍या मुलीचे घरोघरी थाटात स्वागत होऊ लागले आहे. केवळ सुशिक्षित, उच्च किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर सर्वसामान्य कष्टकरी समाजातही स्त्रीजन्माचा आनंदोत्सव साजरा होताना दिसत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढल्याची शुभवार्ता आहे.
एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत एकूण जन्मनोंदीनुसार महापालिका क्षेत्रात सरासरी हजार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर 909 आहे. गेल्या वर्षी हा जन्मदर हजार मुलांच्या तुलनेत फक्त 884 होता. जुन्या पिढीतमध्ये रूढ झालेली स्त्री-पुरुष असमानता आता काळाच्या ओघात मागे सरली आहे. जन्मदराची दरी दूर करण्यासाठी सोनोग्राफीमध्ये लिंगपरीक्षण बंदी, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी, तसेच सामाजिक जनजागृती शहरात सुरू आहे. त्याचा परिणाम आता हळूहळू दिसत असून, गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. दीड वर्षापूर्वी शहरातल्या पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मनपा वैद्यकीय विभागाने छापा टाकत त्यावर कारवाई केली होती. महापालिका क्षेत्रात वर्षभरात एकूण 22 हजार 543 बाळांचा जन्म झाला. यात 11 हजार 808 मुलांचा, तर 10 हजार 735 मुलींचा समावेश होता. यात टक्केवारीनुसार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर सरासरी एक हजारला 909 आहे. शहरात अजूनही छुप्या पद्धतीने अवैधरीत्या गर्भलिंगनिदानासह गर्भपात केले जात असल्याचे मागील काही घटनांवरून दिसले आहे. त्यामुळे याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला यासंदर्भात आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ.
लिंग गुणोत्तरात सुधारणा.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेचा परिणाम.
नागरिकांमध्ये जागरूकता वाढली.

वर्ष 2025-26 मधील जन्मदराचे प्रमाण
महिना              स्त्री       पुरुष        लिंग गुणोत्तर प्रमाण
एप्रिल 2025          916         979                       936
मे                           881        1148                      767
जून                        934       1037                      901
जुलै                       934        1069                     874
ऑगस्ट                  779         863                     903
सप्टेंबर                  853        924                      923
ऑक्टोबर              608         711                      855
नोव्हेंबर                945         988                     956
डिसेंबर                  929        1015                    915
जानेवारी 2026     915        987                      927
फेब्रुवारी                 894       907                      986
मार्च                     1147        1180                   972
एकूण                  10,735    11,808                909

 

Improvement in the birth rate of ‘Nakoshi’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *