राज -भाजपा आणि भोंगे

तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या, अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वाक्य वाचलं आणि मला 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी पाडल्यानंतर जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, या देशाला हलवून टाकणार्‍या वाक्याची आठवण झाली.
त्याआधी 1987 साली विलेपार्ले पोटनिवडणुकीसाठी बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा नारा दिला होता. तेव्हाचे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांना बाळासाहेबांच्या प्रभावाची कल्पना आली. आणि जनता दल, शेकापकडून लाथाडल्या गेलेल्या भाजपने 1989 साली शिवसेना-भाजप युती केली. त्याच वर्षीच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आपले भाषण सुरू करण्याच्या आधी आद्य सरसंघचालक स्व. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक स्व. गोळवलकर यांचं स्मरण करून आपल्यातील हिंदुत्वाची चुणूक दाखवून दिली.
राज यांची एकूण राजकीय वाटचाल पहिली तर ते अगदी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जात आहेत, असे लक्षात येईल. बाळासाहेबांना शिवसेना स्थापनेपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी कामगार जगतातील कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव रोखण्यासाठी छुपी मदत केली. आचार्य अत्रे शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे यातच सारं आलं.
पुढे याच बाळासाहेबांनी विरोधी पक्षातील कॉंग्रेसच्या मुरली देवरांना मुंबईचं महापौर पद दिलं आणि त्या बदल्यात तीन शिवसेना नेत्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली. त्यातील एक माझी मुख्यमंत्री मनोहर जोशी. 1989 ला बाळासाहेबांनी भाजपचा हात धरला. ज्याला ते अनेक वेळा त्यांच्या ठाकरी स्टाईलमध्ये कमळाबाई म्हणत तो मरेपर्यंत कायम ठेवला. बाळासाहेबांना कॉंग्रेसने गुप्तपणे मदत केली आणि पुढे त्यांच्याशी युतीही केली आणि ते इंदिरा गांधींना भेटूनही आले. राज यांची राजकीय कारकीर्द तशीच आहे. तेही सोनिया गांधींना भेटून आले. बाळासाहेबांनी दक्षिण भारतीयांविरुद्ध आवाज उठवला तर राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध. 2019च्या निवडणुकीत मलाव रे तो व्हिडीओ म म्हणत त्यांनी मोदी -शहा यांच्याविरुद्ध कॉंग्रेसला मदतच केली. पण आता माझ्या दृष्टीने राज त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक आणि महत्त्वाची खेळी खेळत आहेत.भाजपला 145 चा आकडा गाठण्यासाठी छोट्या पण प्रभावी पक्षाची गरज आहे तर लागोपाठच्या दोन निवडणुकात प्रत्येकी एक आमदार निवडून आणणार्‍या राजना एका मोठ्या आधाराची. उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीचा हात धरला त्यामुळे राज यांचा तो मार्ग बंद झाला आणि त्यांना भाजपशिवाय पर्याय उरला नाही. राम मंदिर निर्मितीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने सोडवल्यानंतर आता हिजाब , मशिदींवरील भोंगे असे धार्मिक भावनांना हात घालणारे विषय हातात घेण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. कर्नाटकात हिजाबच्या नावाने धुमाकूळ घातल्यानंतर मशिदींवरील भोंग्यांचा विषय भाजपने राज यांच्याकडे दिलेला दिसतो. पाहुण्यांच्या हातून साप मारून घेण्याचा प्रकार! भाजप यात वाकबगार आहे.
प्रथम समाजवाद्यांच्या खांद्यावर बसून मोठ्या झालेल्या भाजपने नंतर समाजवाद्यांनाच संपवले.पुढे त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. पण अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास नकार दिल्याने त्यांची युती तुटली. बाळासाहेबांची वक्तृत्व शैली आणि अचूक टायमिंग लाभलेल्या राज यांनी अखिल भारतीय स्तरावर येत्या 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावेत, असा इशारा देत तसे न झाल्यास मशिदिसमोर दिवसातून पाच वेळा हनुमान चालीसा म्हटली जाईल असा इशारा दिला आहे. नमाज दिवसातून पाच वेळा पढली जाते म्हणून हनुमान चालीसा पाच वेळा. आणि हिंदी बेल्ट मध्ये हनुमान चालीसा पाठ नाही असा हिंदू सापडणार नाही. आणि नेमका त्या स्तोत्राचा उल्लेख करून राज यांनी उत्तर भारतीय किंवा हिंदी बेल्ट मध्ये स्वत: ची हिंदुत्ववादी म्हणून इमेज तयार केली.
सुमारे दोन दशकांपूर्वी याच हिंदी भाषिकांच्या विरुद्ध आणि हम तो हिंदी मे बात करेंगे अस म्हणणार्‍या जया बच्चन यांच्याविरुद्ध राडेबाजी आणि बहिष्काराची भाषा त्यांनी केली होती. पण आज परिस्थिती बदलली आहे. भाजपचा खरा बेस उत्तर भारतात आहे. राम मंदिर आणि भाजप यांचं अविभाज्य नात आहे. त्यामुळे राज यांनी जाणीवपूर्वक रामभक्त हनुमानाच्या स्तोत्राची निवड केली असावी असं वाटतं. यामुळे संघ परिवाराच्या बजरंग दलाच्या सध्या तथाकथित गोरक्षणाशिवाय कोणतेही काम नसणार्‍या या तथाकथित गुंडांना एक काम मिळवून दिलं. जणूकाही रामभक्त हनुमान तसे भाजपभक्त राज!
मंदिरे वा मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा कोणाताही आदेश नाही. परवानगीने भोंगे लावण्यात आले असतील तर ते काढण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. फक्त वेळ आणि आवाजाचे बंधन पाळावे लागेल, ही वस्तिु्थती आहे. केवळ रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वाजविण्यास बंदी घातली आहे.
उद्धव ठाकरे कॉंग्रेसच्या कळपात गेल्यापासूनच राज ठाकरेंनी भगवेकरणास सुरुवात केली होती.
आपल्या पक्षाच्या ध्वजाचा रंग पूर्ण भगवा केला आणि त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा उल्लेख केला आणि हिंदुत्वाची कास धरत भाजपशी युती करण्याचा एक मार्ग उघडला. पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत केलेला हा चौथा बदल.
मुंबईच्या पत्रकार सृष्टीतील बाळासाहेबांना विरोध करणार्‍या समाजवादी आणि साम्यवादी पत्रकारांनी प्रथमपासूनच राज यांचे गोडवे गाण्याचे काम सुरू केले होते . ते आजही सुरू आहे. कदाचित ते राज याना बाळासाहेबांचा भविष्यातील पर्याय म्हणून पाहत असावेत. आणि राज यांचं प्रथमपासून लक्ष होत शिवसेनाप्रमुख पदावर.
2009च्या विधानसभेत राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले होते. पक्ष स्थापन केल्यापासून अवघ्या तीन वर्षाच्या आत राज आणि त्यांचा पक्ष राज्यातील पाचवी शक्ती म्हणून उदयास आले होते. 2009 ला जरी राज यांनी कुणाशीच युती न करता निवडणूक लढवली असली तरी गुप्तपणे उद्धव ठाकरेंवर नाराज असणारे अनेक भाजपचे नेते राजना मदत करत होते.
भाजप आणि मनसेच्या जवळीकीचा परिपाक म्हणूनच की काय राज आपल्या 13 आमदारांच्या बरोबर 2011 ला चक्क गुजरात दौर्‍यावर गेले होते.आणि मोदींनी केलेल्या विकासाची त्यांनी तोंड भरून स्तुती केली होती. इतकंच नव्हे तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर त्यावेळचे भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मन मागता दिलेला पाठिंबाफ अस म्हणत त्यांची खिल्लीही उडवली होती. पण उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले सर्वच भाजप नेते आपला भविष्यातील साथीदार म्हणून राज यांच्याकडे पाहत होते.
पण सुरुवातीला मिळालेलं यश राजना राखता आलं नाही. नाशिक महानगरपालिका त्यांच्या हातून गेली. मुंबईतील अनेक नगरसेवक सोडून गेले शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासारखे सहकारी सोडून गेले. आणि विधासभेत लागोपाठ दोन वेळा मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. तरीही ठाकरे आडनावाच्या भरवशावर राज हे सतत बातम्यात राहिले. जसे प्रकाश आंबेडकर राजकारणात उल्लेखनीय यश न मिळता आंबेडकर या नावामुळे बातम्यात राहतात. निवडणुकीच्या आखाड्यात आंबेडकरांच्या वेगळ्या चुलीचा फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या आघाडीला बसतो तर आता मनसेच्या उमेदवारीचा फटका सेनेला बसेल असा अंदाज भाजपचे नेते बांधत असावेत.
मोदी -शहाविरुद्ध गरळ ओकणारे राज बांगला देशींच्या मुद्द्यावर भाजपला समर्थन देऊ लागले तेव्हाच सर्व पक्षाकडून नाकारले गेलेले राज आपल्या मूळ हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळतील अस वाटू लागलं होतं.
राज यांच इव्हेंट मॅनेजमेंट हाही त्यांच्या वाटचालीतला महत्त्वाचा दुवा त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट ची चुणूक मायकेल जॅक्सन आणि लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात आली होती. 27 लाख बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी या दोन कार्यक्रमांचं आयोजन केले होतं. आता त्यामुळे किती लाख तरुणांना काम मिळालं आहे हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. याच काळात राज यांचं नाव रमेश किणी मृत्यू प्रकरणातही वर आलं होतं. आपल्या मुलाला अमितला राजकारणात आणतानाही त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट च कौशल्य
दिसलं.
शिवसेना जोपर्यंत भाजपबरोबर होती तोपर्यंत मनसेला भाजपचे दरवाजे बंद होते. भलेही भाजपच्या अनेक नेत्यांचा छुपा पाठिंबा होता. पण आज शिवसेना कॉंग्रेस च्या जवळ गेल्यानंतर मनसेला किंवा राज ठाकरे यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. उध्दव आणि राज या दोन चुलत भावातील ही राजकीय दुष्मनी उद्धव यांनी केव्हाच जिंकली आहे. ते स्वतः मुख्यमंत्री झालेत तर आपल्या मुलाला आदित्यला कॅबिनेट मंत्री पद दिल आहे.
प्रथम राज यांच्या पक्षाचा चौरंगी झेंडा होता . त्यात निळा, हिरवा, भगवा आणि पांढरा असे दलित, मुस्लीम आणि हिंदुत्वाचा रंग दाखवणारे रंग होते. सर्वसामावेशकतेचा आव आणण्यासाठी त्यांनी चार रंग वापरले पण त्यांची मजल शिवसेनेची मत खाण्याच्या पालिकडे गेली नाही. आणि शेवटी त्यांना भगव्या रंगाकडे वापस यावं लागलं. जणू सार्‍या रंगात रंगण्याचा प्रयत्न विफल ठरल्यानंतर त्यांना भागव्याकडे वापस यावं लागलं. आणि म्हणून श्रेष्ठ कवी स्व सुरेश भट यांची क्षमा मागून त्यांच्या दोन ओळीं वेगळ्या शब्दात लिहिण्याची हिम्मत करत आहे. मजाउनी रंगात सार्‍या, शेवटी रंग राजचा भगवा..

जयंत माईणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *