ध्वजारोहणासाठी रामकुंड सज्जतेच्या अंतिम टप्प्यात

युद्धपातळीवर सुशोभीकरण

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा शुभारंभ करणार्‍या ध्वजारोहण सोहळ्यासाठी रामकुंड व गोदाघाट परिसरात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. येत्या 31 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी रामकुंड येथे धर्मध्वजारोहण होणार आहे.
या सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महापालिका व कुंभमेळा प्राधिकरणाकडून सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, मंडप उभारणी, मंदिरांची रंगरंगोटी, भाविकांची बैठकव्यवस्था आणि सुरक्षेच्या कामांना वेग देण्यात आला आहे. धार्मिक विधींचे नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची रंगीत तालीमही पूर्ण झाली आहे. रामकुंड परिसरात सध्या विविध ठिकाणी कामे सुरू असल्याने या भागाला अघोषित बंदचे स्वरूप आले आहे. अनेक दुकाने बंद असून, नागरिकांची आणि व्यावसायिकांची वर्दळ कमी झाली आहे. गोदाघाट परिसरात लोखंडी जाळ्या उभारून गोदावरी महाआरतीसाठी जागा निश्चित केली जात आहे. ध्वजारोहणाच्या ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. भाविकांच्या बैठक व्यवस्थेसाठी मोठ्या लोखंडी खांबांच्या सहाय्याने मंडप उभारले जात आहेत.

भगवे ध्वज, रोषणाईने परिसर उजळणार
ध्वजारोहणस्थळी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. भाविकांच्या बैठकव्यवस्थेसाठी मंडप उभारले जात असून, विद्युत रोषणाईची कामे सुरू आहेत. रामकुंड परिसरातील मंदिरे, घरे आणि दुकानांच्या रंगरंगोटीमुळे परिसराला एकसारखे आणि आकर्षक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परिसरातील मंदिरांची डागडुजी
परिसरातील मंदिरांची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात येत आहे. घाट परिसर स्वच्छ आणि आकर्षक करण्यासोबतच सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

दुतोंड्या मारुतीलाही नवे रूप
धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर रामकुंड परिसरातील मंदिरांच्या डागडुजीसह रंगरंगोटीवर भर देण्यात आला आहे. दुतोंड्या मारुती मंदिरालाही रंगरंगोटी केली जात आहे. घाट परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

विविध कामांमुळे व्यवसाय ठप्प
रामकुंड परिसरातील दुकाने बंद असून, विविध कामांमुळे नागरिकांची वर्दळही कमी झाली आहे. परिसराकडे जाणारे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यटक आणि भाविकांना अडचणी येत आहेत. व्यवसायावर परिणाम होत असून, पर्यायी धार्मिक विधींच्या ठिकाणांची माहिती नसल्याने काही भाविकांचा गोंधळ उडत आहे.

वाहतुकीवर निर्बंध, पर्यायी मार्गांचा वापर
राष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या पाश्वर्र्भूमीवर 30 व 31 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रामकुंड आणि पंचवटी परिसरातील काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Ramkund in final stages of preparation for flag-hoisting ceremony

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *