अंनिसच्या प्रयत्नांनंतर दारणा सांगवीच्या भोंदूबाबाला अटक
नाशिक : प्रतिनिधी
जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर बलात्कार करून नंतर विवाह केला, तसेच मानसिक व शारीरिक छळ करणार्या दारणा सांगवी येथील भोंदूबाबाला सायखेडा पोलिसांनी अटक केली. या भोंदूबाबाच्या अटकेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यामुळे या भोंदूबाबाचे कांड उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाने अजून किती महिलांना फसविले याचा सायखेडा पोलिस शोध घेत आहेत.
पंचवटी येथील एक महिला चहाचे दुकान चालवत होती. पण ते जास्त चालत नव्हते. व्यवसायात बरकत व्हावी म्हणून ओळखीच्या लोकांनी तिला दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन भानुदास गोवाड याच्याशी संपर्क करून दिला. भोंदूबाबाने तिला मंतरलेले तांदूळ, कडक उद जाळून त्याची दुकानात धुणी दिली. मंतरलेल्या पाचोळ्याची,जडीबुटीची पूड पाकीट दुकानात ठेवल्याने व्यवसायाची भरभराट होईल, असे खोटे सांगून महिलेला फसविले. तिच्याकडून तीन हजार रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर जादूटोणा करून मारून टाकेन, अशी धमकी देऊन तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. नंतर मात्र घरातच भोंदूगिरी सुरू केल्याने ही बाब महिलेस आवडली नाही. त्यामुळे तिने विरोध सुरू केला असता, तिला लाथाबुक्क्यांनी मारणे, धमकी देणे असे अमानुष प्रकार या भोंदूबाबाने सुरू केले.
दोन-तीन वर्षे हा अमानुष छळ या पीडित महिलेने सहन केला. मात्र, तीन-चार दिवसांपूर्वी या भोंदूबाबाने त्याच्या एक वर्षाच्या मुलाचा व या पीडित महिलेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.तिने कसेबसे स्वतःला वाचवले आणि नातेवाइकांना बोलावून महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानुसार महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिलेला घेऊन नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांचे कार्यालय गाठले. सदर घटनेचा सखोल तपास करून संबंधित भोंदूबाबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सायखेडा पोलीस स्टेशनला दिले. त्याप्रमाणे या भोंदूबाबाविरोधात जादूटोणाविरोधी कायदा, तसेच अन्य कायद्यानुसार सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल. पोलिसांनी सदर भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
अनेकांना फसविल्याचा संशय
यौवन गोहाड या भोंदूने आजपर्यंत अनेक व्यक्तींना, कुटुंबांना मंत्र-तंत्र, जादूटोणा करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या प्रकारे फसवून त्यांचे शोषण केले असण्याचा संशय महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशा फसवणूक व शोषण झालेल्या पीडित व्यक्तींनी धाडसाने पोलिसांमध्ये तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री, कृष्णा चांदगुडे आदींनी केले आहे.
Rape by instilling fear of black magic, followed by forced marriage.