रायला महोत्सवात विद्यार्थी दंग

मुक्तचा स्टुडिओ, सह्याद्री फार्म पाहून फुलले हास्य

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात आयोजित केलेल्या रायला महोत्सव दरम्यान आदिवासी भागातील मुलांना विद्यापीठाचा दृकश्राव्य स्टुडिओ दाखविण्यात आला. हा स्टुडिओ पाहून मुले भारावून गेली. आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा स्टुडिओ पाहून आनंदाला उधाण आल्याचे मुलांनी सांगितले. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुललेले पाहायला मिळाले.
ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात रायला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील  आश्रम शाळांतील तब्बल 100 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. विद्यापीठाच्या दृकश्राव्य केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती कशी केली जाते. स्टुडिओचे कामकाज कसे चालते, त्याची रचना कशी असते याबाबत संतोष साबळे यांनी मुलांना माहिती दिली. महोत्सवाच्या दरम्यान मुलांची सह्याद्री फार्मर्स कंपनीला भेट घडवून आणली. शेतकर्‍यांच्या सहभागातून उभी केलेल्या या कंपनीचा विस्तार आणि उत्पादने पाहून मुलांचा आनंद गगनाला भिडला होता. रस्ता सुरक्षेबाबत सतीश मंडोरा, दहावी बारावी नंतरच्या करिअर संधीबाबत विक्रम बालाजीवाले यांचे करिअर मंथन, अनिरुद्ध अथणी आणि डॉ. श्रिया कुलकर्णी यांचा फिटनेस मंत्र, ब्राह्मणवाडेच्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी केलेले कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचा मुलांनी आनंद लुटला. रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनूवाला यांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

महोत्सवाचा आज (रविवारी) शेवटचा दिवस असून मुलांना विद्यापीठाच्या कृषी प्रक्षेत्राची सफर घडवून आणली जाणार आहे. कम्युनिटी सर्व्हिस संचालक तथा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमराज राजपूत हे  ग्रामविकासात  कृषी विज्ञान केंद्राचे योगदान यावर राजपूत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर समारोप दुपारी एक वाजता आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *