बंडखोरांच्या बॅनर, पोस्टवरून उद्धव ठाकरे गायब !

नाशिक : अश्‍विनी पांडे
राज्यात शिंदेशाहीचे सरकार स्थापन झाले. या सरकारने विश्‍वासदर्शक ठरावही जिंकला. आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री आहोत, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार सांगत असले तरी प्रत्यक्षात या आमदारांकडून केल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या पोस्टमधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोलाच स्थान देण्यात आलेले नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्याऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो टाकण्यात येतो. त्यामुळे पक्षप्रमुखांना स्थान न देता ही मंडळी शिवसेनेचे असल्याचा दावा कसा करू शकतात, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला. शिवसेनेच्याच आमदाराने केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर झाले आहे. बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेले आमदार आम्ही शिवसैनिक असल्याचे अद्यापही सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मी निष्ठांवान शिवसैनिक असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्याच आमदारानी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याबद्दल शिवसैनिकामध्ये बंडखोराबद्दल राग आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून बंडखोर आमदार गद्दार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बंडोखोराचा राज्यभर शिवसेनिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करण्यात आला. मात्र बंडखोर आमदार आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. आम्ही शिवसेनेच्या आत्मसन्मानासाठी गेलो आहोत..आम्ही येत्या काळात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करू. बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी पुढे नेऊ असे सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बंडखोर आमदार शिवसेने प्रति निष्ठा व्यक्त करत असले तरी बंडखोर आमदारांच्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये,बॅनरवर शिवसेनेचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मात्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ्रआणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या फोटोला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे बंडखोर पक्षप्रमुखालाही स्थान देत नसल्याचे चित्र आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *