लाल तिखट मसाला बनवण्याची महिलांची लगबग
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव व परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दरवर्षीप्रमाणे महिलांकडून विविध प्रकारचे मसाले तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. दररोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा लाल तसेच काळा मसाला हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असल्याने दोन्ही प्रकारचे मसाले बनवण्यासाठी महिलांकडून तयारी केली
जात आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, ही दरवाढ थेट सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. गेल्या हंगामात मुबलक उत्पादनामुळे मिरचीचे दर आटोक्यात होते, मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे. सध्या बाजारपेठेत महिलांकडून मसाल्यांच्या खरेदीला चांगलाच वेग आला असून, मिरची, मिरची पूड आणि खडा मसाला यांना मोठी मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च ते एप्रिल महिन्यात लाल तसेच काळा मसाला बनवण्याची तयारी सुरू होते आणि आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
दरम्यान, या प्रक्रियेत महिलांची मेहनत खूप मोठी असते. मिरची निवडणे, वाळवणे, भाजणे, दळणे आणि योग्य प्रमाणात मिश्रण करणे, या सर्व टप्प्यांमध्ये बारकाईने लक्ष द्यावे लागते. त्यामुळे हा केवळ घरगुती उपक्रम न राहता अनेक महिलांसाठी रोजगाराचे साधनही बनला आहे. काही महिला घरगुती मसाले विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत, तर काही जणी ऑर्डरनुसार मसाले तयार करून देतात.
Red chilli prices increase by up to 40 percent