संपादकीय

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग
किती तू मज दाखवले
साक्षात्कार, विभावन,
अनुभूती, दृष्टान्त
असे सगळे एकाच
जन्मी मज लाभले
तुका म्हणे ज्ञानियांचा
राजा गुरू महाराव
लाभला तवहृदयी त्यांचे प्रतिबिम्बाचा ठाव
सदैव जपेन मी हा
अमृततुल्य दुर्लभ भाव ।

भाऊ म्हणजे आदरणीय बाळासाहेब वाघ, क. का. वाघ संस्थेचे सर्वेसर्वा, हजारोंचे पोशिंदा! 6 फेब्रुवारीच्या लतादीदींच्या निर्वाणाच्या दु:खात बुडालेले असताना भाऊंची निधनाची बातमी वाचली. बधीर झालेल्या मनशून्यतेवर आणखी किती बधीरता येणार? शोक, आक्रंदन, वियोग या शब्दांतही व्यक्त न करता येणारी भावना दाटून आली. विमनस्क अवस्था कशी असू शकते याची प्रचिती आली.
आज मी हे लिहू शकते कारण इतके दिवस भाऊंच्या निधनाची बातमी माझ्या मनःपटलावर स्थिरावतच नव्हती असं मी त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्त्व पाहिलेलं आहे. त्यामुळे ही वार्ता माझे मन स्वीकारूच शकत नव्हते. मी रोजच भाऊंना भेटत होते असेही नाही, तरीही भाऊ माझ्या मनाच्या अशा ठिकाणी होते जिथे ईश्वर असतो. लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांचेच ते भाऊ होते. आमचं बालपण भाऊसाहेबनगरमध्ये गेलं. माझं तर भाऊंच्या मळ्यात आणि मामी शकुंतलाताई वाघ यांच्या सहवासात गेले. भाऊ, मामी यांच्यासोबत मला मिळालेले काही अमूल्य क्षण आठवले की, मी किती भाग्यवंत आहे, हे सतत जाणवत राहते. माझे शालेय शिक्षण क. का. वाघ विद्याभवनमध्ये झाले. प्राध्यापिका म्हणून पहिली नोकरीही क.का. वाघ तंत्रनिकेतनातच मिळाली. जर का आपल्याला अशी नितळ, स्वच्छ अंतर्बाह्य शुचिर्भूत प्रतिमा आपल्या आसपास बघायला मिळाली तर आपल्या या पाठ्यपुस्तकातल्या दिव्यत्वाची प्रतिमा दाखवणार्‍या संकल्पनेवर विश्वास बसायला लागतो. तसे काहीसे माझ्यासोबत होत होते. मी पाचवीत गेले आणि आमच्या शाळेच्या परिसरात अधूनमधून अशी एक व्यक्ती मला अनेक लोकांच्या गर्दीतून वेगळी भासू लागली. कारण त्या व्यक्तीचा वेश, दिसणं, हसणं, सगळं निखळ होतं. मला कळले ही व्यक्ती म्हणजे आपण मामींकडे जातो खेळायला तिथे कधीकधी दिसते. कारण तेव्हा मामी जास्त जवळच्या. जसजशी मोठी होत गेले तसतसे कळायला लागले ही फार महत्त्वाची व्यक्ती आहे, पण संस्थाचालक वैगरे कळण्याचे ते वय नव्हते. बारावीपर्यंत ‘भाऊ’ या व्यक्तिमत्त्वाची अशी पकड मनात खोलवर रुजलेली होती. मग मधली काही वर्षे शिकण्यासाठी बाहेरगावी गेली आणि वाघ कुटुंबाशी माझा संपर्क दुरावला. माझं पुणे विद्यापीठातलं शिक्षण संपलं. मी भाऊसाहेबनगरला परत आले तसा मला श्री. शिंपी सरांनी निरोप दिला. तू कॉलेजमध्ये येऊन एकदा भाऊंना भेटून घे. मी नाशिकला त्या भव्य कॅम्पसमध्ये भाऊंना भेटायला माझ्या धाकट्या बहिणीसोबत गेले. भाऊ : मोठी झालीस. पुणे विद्यापीठात शिकलीस असं ऐकलं. मी : हो भाऊ. भाऊ : पुण्यातलं तुला काय काय माहितीय? जयकर लायब्ररी, ब्रिटिश लायब्ररी? आयुका ? मैफली ऐकल्या की नाही… असं म्हणत भाऊ स्वतःच त्यांच्या पुण्याच्या आठवणीत दंग होऊन पुण्यातल्या एकेक गोष्टी मला सांगू लागले. (मी अवाक्!)
भाऊ : तुला यायचंय इथे शिकवायला आपल्या मुलांना. मी : हो भाऊ, पण अजून रिझल्ट नाही लागला. भाऊ : लागेल, तू पास होशील. आमची विद्यार्थिनी आहेस तू! बस्स मग काय माझे भाऊसाहेबनगर ते नाशिक दररोजचे येणे-जाणे सुरू झाले. एकदा भाऊंनी मला भाऊसाहेबनगरच्या स्टॅन्डवर बसची वाट बघताना पाहिले असावे. ड्रायव्हर बोलवायला आला. मी म्हटले, मी तुमच्यासोबत येऊ भाऊ? भाऊ म्हणाले, चल! भाऊंची निधनाची बातमी समजल्यानंतर एकेक गोष्टी डोळ्यासमोरून सरसर चालल्या होत्या. के. के. वाघ विद्याभवन व पुढे के. के. वाघ तंत्रनिकेतन, तिथल्या मातीने मला बौद्धिक सुगंध दिला.
जेवढे दिवस मी के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये होते त्यातले कित्येक वेळा भाऊंबरोबर ’भाऊसाहेबनगर ते कॉलेज’ त्यांच्यासोबत येण्याचे भाग्य आणि सन्मान मला मिळाला, हे माझं पूर्वसंचित! याला साक्षात ईश्वर सहवास म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आम्ही स्वतःची शाळा सुरू केल्यानंतर मी एकदा भाऊंना भेटायला गेले. तर मला म्हणाले, ‘फार ऐकतोय मी तुझ्या शाळेबद्दल.’ मी म्हटलं, ‘भाऊ, सगळं तुमचंच देणं आहे. जे के. के. वाघ विद्याभवनने ज्ञानाचं दान मला दिलं तेच मी माझ्या शाळेत रुजवतेय. माझ्या जगण्यात, वागण्यात के. के. वाघचेच संस्कार आहेत. तुम्हीच रुजवलेलं रोपटं आहे. अजून फार लहान आहे. हळूहळू आकार घेतंय. के. के. वाघ म्हणजे वटवृक्ष. त्याच्या फांद्या जगभर पसरल्यात. के. के. वाघच्या मुशीत तयार झालेला प्रत्येक विद्यार्थी के. के.चे ऋण विसरू शकत नाही. हा बुद्धीचा प्रत्येक श्वास के. के.ने दिलाय.’, तर म्हणाले, ‘तुला खरंच असं वाटतं? मी म्हणाले, ’असं का विचारता भाऊ?’ तुमच्या दूरदृष्टीशिवाय ही संस्था चालली असती का? तुमच्या आधाराशिवाय आमच्यासारखे विद्यार्थी घडले असते का? असे हजारो विद्यार्थी तुम्ही घडवले, तेही निष्काम कर्मयोग्याप्रमाणे. तुम्हीच आम्हाला हा कर्मयोग शिकवला. तुम्हीच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे महागुरू आहात.’ ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा…’ हेच आम्ही तुमच्याकडून शिकलो.
वाघ परिवाराचे माझ्यावर फार ऋण आहेत. त्या ऋणातच राहून सतत चांगलं कार्य करत राहण्याचे आश्वासन नक्की देईन. कारण ते त्यांच्याकडूनच मिळालेले देणं आहे. त्यांचे माझ्यावर एवढे प्रेम असण्याचे मूळ कारण त्यांचे माझ्या आई-वडिलांवर असलेले प्रेम! मामींनी तर माझ्या आईवर फारच प्रेम केले ते शब्दातीत आहे. भाऊंनी माझ्या वडिलांवर केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे, तर एक कलाकार म्हणून प्रेम केले. मला वाटते ज्या क्षणी आपल्याला प्रेम ओळखता येते तिथून पुढचा आयुष्याचा प्रवास वेगळे वळण घेतो आणि व्यक्ती म्हणून आपण बदलत जातो. त्यांच्या स्वभावाचे दोन पैलू : एक म्हणजे कडक प्रशासकीय अधिकारी आणि दुसरे प्रेमळ पितृतुल्य माणूस! भाऊ आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत. ते देहातीत गुरू बनून सतत आपल्यासोबत राहतील.

Reflections of a Mentor: Balasaheb Wagh

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

37 minutes ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

39 minutes ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

46 minutes ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

54 minutes ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

1 hour ago

यूपीएससीच्या स्वप्नाचा प्रवास धरणाच्या पाण्यात

डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू चांदवड : प्रतिनिधी मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर…

1 hour ago