संपादकीय

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

– अश्विनी पांडे

सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ, पावसाळ्यामुळे कामांच्या गतीवर झालेला परिणाम आणि काही प्रकल्पांना स्थानिकांकडून होत असलेला विरोध यामुळे तयारीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. ध्वजारोहणाचा मुहूर्त जवळ आल्याने प्रशासनाने आता कार्यक्रमाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, कार्यक्रमाची तयारी आणि सिंहस्थासाठी आवश्यक असलेली कायमस्वरूपी विकासकामे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. पहिला टप्पा यशस्वी करण्याच्या प्रयत्नात दुसर्‍या टप्प्यातील अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, हीच अपेक्षा आहे.
रामकुंड परिसरात विकासकामे सुरू असल्याने काही भागांतील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. घाटांची स्वच्छता, दुरुस्ती आणि परिसरातील कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. सोहळ्याच्या वेळी अपूर्ण कामांचा पसारा दिसू नये, यासाठी काही भाग झाकण्याचीही तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सिंहस्थासाठी करण्यात येणारी कामे ही केवळ सोहळ्यापुरती नसून आगामी पर्वात लाखो भाविकांना त्यांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे कामांचा दर्जा आणि त्यांची उपयुक्तता यांना अधिक महत्त्व द्यावे लागणार आहे.
त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थाची स्वच्छता, दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी ते 30 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी नूतनीकरण केलेल्या कुंडाचे उद्घाटन करण्याची तयारी आहे. मात्र, धार्मिक विधींसाठी येणार्‍या भाविकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. श्री त्र्यंबकराजाचे मंदिरही काही काळ बंद ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आला असला, तरी त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच गोदावरीतील पाण्याची उपलब्धताही महत्त्वाची ठरणार आहे. सिंहस्थाच्या कामांमुळे रामकुंड परिसरातील काही कुंडांमधील पाणी काढण्यात आले असल्याने ध्वजारोहणाच्या वेळी गोदावरी प्रवाही ठेवण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा पर्याय चर्चेत आहे. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. धार्मिक सोहळ्याची गरज आणि पाण्याचे नियोजन यांचा समतोल साधण्याचे आव्हान असणार आहे.
एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारीने जोर धरलेला असताना सिंहस्थाच्या तयारीला सुरवातीपासून लागलेले शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. एकामागून एक वाद उभे राहत आहेत. रामकुंडावरील गोदावरी महाआरतीच्या आयोजनावरून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ध्वजारोहणाच्या दिवशी आरतीवरून सुरू झालेला वाद सोडविण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. 31 ऑक्टोबर 2026 रोजी एकच आरती आयोजित करण्याचा तोडगा पुढे आला असला, तरी संबंधित संस्थांमधील मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का, हा प्रश्न कायम आहे. धार्मिक परंपरा आणि आरतीच्या आयोजनाबाबतचा वाद ऐन सोहळ्याच्या तोंडावर निर्माण होणे, ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजस्तंभावरील बोधचिन्हावरून निर्माण झालेल्या वादानेही या प्रश्नांंत भर घातली आहे. धर्मध्वजस्तंभ पूजनाच्या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यावरून नाराजी व्यक्त झाली, तर बोधचिन्हाच्या वापरावरही आक्षेप घेण्यात आले. पुरोहित संघाने बोधचिन्ह नोंदणीकृत असल्याची भूमिका मांडली आहे. धार्मिक सोहळ्याच्या आधीच अशा प्रकारचे वाद निर्माण होणे योग्य नसून, सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. सिंहस्थ हा व्यापक धार्मिक आणि सामाजिक सोहळा असल्याने त्याच्या नियोजनात समन्वय असला, तरच सोहळा सुसह्य व भव्यदिव्य होईल.
सिंहस्थासाठी उभारण्यात येणार्‍या रिंगरोडमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांचे प्रश्नही कायम आहेत. मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. अन्यथा ध्वजारोहणाच्या दिवशी आंदोलनाचा प्रश्न निर्माण झाल्यास सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. तसेच सिंहस्थाच्या सुरवातीच्या टप्प्यावरच विरोधाची नकारघंटा वाजू शकते.
प्रशासनासमोर एक ना अनेक अशी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे या आव्हानांचा सामना करत कुंभपर्वाचा यशस्वी आरंभ करण्याचे मोठे अग्निदिव्य प्रशासनासोबतच शासनालाही पेलावे लागणार आहे. सिंहस्थाचा श्रीगणेशा भव्यदिव्य व्हावा, ही अपेक्षा रास्त आहे; परंतु सोहळ्याच्या तयारीत अपूर्ण कामे, धार्मिक संस्थांमधील मतभेद आणि बाधितांच्या प्रश्नांंकडे दुर्लक्ष होता कामा नये. ध्वजारोहणानंतर विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळते का, वादावर कायमस्वरूपी तोडगा निघतो का आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध होतात का, यावरच आगामी सिंहस्थाच्या तयारीचे यश अवलंबून राहणार आहे.

The commencement of the Simhastha—yet dogged by a persistent trail of obstacles!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

35 minutes ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

38 minutes ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

52 minutes ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

1 hour ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

1 hour ago

यूपीएससीच्या स्वप्नाचा प्रवास धरणाच्या पाण्यात

डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू चांदवड : प्रतिनिधी मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर…

1 hour ago