नियमभंग केल्यास 50 हजारांपर्यंत दंड; आस्थापनांना 15 ऑगस्टची मुदत
नाशिक : प्रतिनिधी
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पात्र आस्थापनाने अंतर्गत समिती स्थापन करून तिची नोंदणी “SHe-Box” पोर्टलवर 15 ऑगस्ट 2026पूर्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013नुसार ही कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, खासगी आस्थापना, उद्योग, व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांसह पात्र सर्व आस्थापनांना हा नियम लागू आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या घटनांना प्रभावीपणे प्रतिबंध करता यावा, यासाठी कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत.
संबंधित आस्थापनांनी अंतर्गत समितीची माहिती ‘डकश-इेु’ पोर्टलवर नोंदविण्यासोबतच समितीची माहिती दर्शनी भागात फलकाद्वारे प्रसिद्ध करावी. तसेच कायद्यातील इतर सर्व तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विहित मुदतीत कायद्यातील तरतुदींचे पालन न करणार्या आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. कायद्यानुसार 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून, त्याशिवाय इतर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे संबंधित आस्थापनांनी 15 ऑगस्टपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले.
“SHe-Box”नोंदणी का महत्त्वाची?
“SHe-Box”च्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठीची यंत्रणा अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पात्र आस्थापनात अंतर्गत समिती कार्यरत असणे आणि तिची माहिती पोर्टलवर नोंदविलेली असणे आवश्यक आहे.
महिलांसाठी मदत
महिला हेल्पलाइन : 181
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंदर्भात मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क साधता येणार आहे.
Registration of committee mandatory for women’s safety.