मुंबई : प्रतिनिधी
जलसंपदा विभागाच्या 5 ऑगस्ट रोजीच्या अधिकृत अहवालानतून महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण 3,029 लहान-मोठ्या धरणांमध्ये 70.39टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्यातील 138 मोठ्या धरणांनी 80टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून, पुणे आणि कोकण विभागात अनेक धरणे 100टक्के क्षमतेने भरली आहेत.
राज्यातील 6 महसुली विभागांमधील सर्व प्रकल्पांची (मोठे, मध्यम व लघु) स्थिती खालीलप्रमाणे आहे :
पुणे विभाग ( 84.02टक्के)
पुणे विभागाने यंदा पाणीसाठ्यात उत्तम कामगिरी केली आहे. विभागातील 35 मोठ्या धरणांमध्ये 92.01टक्के जलसाठा जमा झाला आहे. 100टक्के भरलेली प्रमुख धरणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, भाटघर, चासकमान आणि ठोकरवाडी (टाटा). इतर प्रमुख धरणे : नीरा देवघर (97.42टक्के), डिंभे (95.34टक्के), पवना (97.14टक्के) आणि उजनी (99.18टक्के).
कोकण विभाग (85.92टक्के)
मुंबई व ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणारी तानसा (99.09टक्के) आणि मोडकसागर (99.96टक्के) ही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत.
नाशिक विभाग (84.31 टक्के)
नाशिक विभागात मोठ्या धरणांची स्थिती अत्यंत मजबूत असून, तेथे 84.31 टक्के साठा झाला आहे. 100टक्के भरलेली धरणे : भाम, ओझरखेड, तिसगाव आणि वाघड. इतर प्रमुख धरणे : गिरणा (99.22 टक्के), गंगापूर (85.87 टक्के), मुळा (78.29 टक्के) आणि भंडारदरा (95.53टक्के).
पाणीप्रश्न सुटला
पुणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणार्या मुख्य धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यामुळे पुढील काही महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेती आणि पिकांसाठी पोषक : मोठ्या धरणांमधील 80 टक्के हून अधिक साठ्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करणे शेतकर्यांना सुलभ होईल. योग्य वापर आवश्यक : जरी साठा समाधानकारक असला, तरी जलसंपदा विभागाने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचे नियोजनपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Relief as many dams in the state fill to full capacity.