26 जानेवारी म्हटले की, आम्हा भारतीयांना प्रजासत्ताक भारताचा अभिमान वाटतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संपूर्ण जगात आपला भारत प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. ब्रिटिशांच्या राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती आणि 75 वर्षे पूर्ण करणार्या प्रजासत्ताक भारताची आजची परिस्थिती यात खूप
अंतर आहे.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात निरक्षरता, अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा व अन्नधान्याचा तुटवडा या समस्यांचा बोलबाला होता. या समस्यांतून देशाला बाहेर काढण्यासाठी तेव्हाच्या अनेक नेत्यांनी ठोस कृती व अचूक उपाययोजना अमलात आणल्या.पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यापक असा मानवतावादी दृष्टिकोन आणि देशासाठी व देशबांधवांसाठी काही ठोस व उचित असे कार्य करण्याची धमक असलेल्या या व इतर नेत्यांनी उचित असे कार्य केले व देशाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. आणि लोकशाही राज्यव्यवस्था लागू करून देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चार मूल्ये रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि आज आपला भारत प्रजासत्ताक देश म्हणून सार्या जगात शोभून दिसतो.
आज आपल्या प्रजासत्ताक भारताची लोकशाहीप्रधान देश म्हणून जगात चांगली ओळख निर्माण झाली आहे. भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक व परंपरांच्या विविधतेने नटलेला भारत देश संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देतो. 1951 पासून लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदार जनतेने लोकसभा निवडणुकीत निवडून दिलेल्या खासदारांनी व त्यांनी निवडलेल्या पंतप्रधानांनी देशाच्या सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना आणल्या. या माध्यमातून हरितक्रांती झाली तसेच धवल क्रांती, शैक्षणिक क्रांती व औद्योगिक क्रांती झाली. गरिबी हटाव मोहीम राबविली गेली. शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी अनेक शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली. कृषी शिक्षणासाठी कृषी विद्यापीठांची, औद्योगिक विकासासाठी आयआयटी संस्थांची आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी एम्स व इतर रुग्णालयांची उभारणी
करण्यात आली.
मोठमोठे उद्योग व कारखाने उभे करण्यात आले. याचे सारे श्रेय लोकशाही राज्यव्यवस्था आणि त्या त्या वेळेच्या पंतप्रधानांना दिले जाते. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी पैसा आणि वेळ लागला असला तरीही विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवणारे आणि समता व सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे संविधान साकारले जाणे फार गरजेचे होते. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी ते संविधान देशाला अर्पण केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अमलात आले. आज आपला प्रजासत्ताक भारत अनेक क्षेत्रांत घोडदौड करीत आहे.
आजच्या स्थितीला भारतात आजही काही समस्या आहेत, परंतु त्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु, आजच्या आधुनिक काळात आपलेच काही भारतीय लोक धर्म, संस्कृती, अंधश्रद्धा आणि पाखंडवाद पसरवून विषमतेचे विष पसरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवतावादी मूल्ये क्षीण केली जात आहेत. ही बाब प्रजासत्ताक भारताला धोकादायक ठरत आहे. सध्या निवडणुकीचे असे वातावरण तयार झाले आहे की, ते पाहून भविष्यात भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात असेल की नाही? अशी पाल मनात चुकचुकत आहे. खरेतर आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.
भारतीय संविधान भारतीय नागरिकांना त्यांच्या खासगी जीवनात धर्माचे व संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार देते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी धर्माचे व संस्कृतीचे हिडीस प्रदर्शन करण्याची मुभा देत नाही. तरीपण भारतातील काही धार्मिक संघटना आजकाल सार्वजनिक ठिकाणी धर्माचा व जातीचा बाजार मांडताना दिसतात.आणि एका विशिष्ट धर्माचे राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण व्हावी, असा हट्ट सुरू करण्यात आला आहे. नेमकी हीच गोष्ट भारतासाठी धोकादायक
ठरू शकते.
लोकशाही राज्यव्यवस्था ही प्रजासत्ताक भारताचा प्राणवायू आहे. भारतात लोकशाहीला फार महत्त्व आहे. प्रजासत्ताक भारत सार्या जगाची शान आहे. आपण सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सावध असले पाहिजे. प्रलोभनाला बळी न पडता निवडणुकीत मतदान केले पाहिजे. भारतीय संविधानातील कर्तव्यांचे पालन करून व हक्कांचे संरक्षण करून आपण सगळ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा! भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो,
हीच शुभकामना!
Republic of India
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…