संपादकीय

प्रजासत्ताक दिन म्हणजेच स्वतंत्र भारताची नियमावली

26 जानेवारी संविधानाचा व नियमांचा आधारस्तंभ आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. परंतु, स्वातंत्र्यानंतर संविधान, देशाची नियमावली असणे गरजेचे असते. कारण कोणत्याही कार्याकरिता पुढे पाऊल टाकण्यास कायद्याचे बंधन असणे आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्यानिमित्ताने भारतातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो.
कारण प्रजासत्ताक म्हणजे लोकांद्वारे लोकांसाठी प्रस्थापित केलेले शासन. भारतात जात, धर्म, पंथ, वंश, गरीब-श्रीमंत, द्वेष या संपूर्ण गोष्टी बाजूला ठेवून गुण्यागोविंदाने प्रजासत्ताक दिवस वेगवेगळ्या संस्कृतीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची लॉर्ड माउंट बॅटन (गव्हर्नर जनरल) यांच्या जागी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. 26 जानेवारीच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीतील राजपथावर राष्ट्रध्वज फडकवला जातो. आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. मुख्यत्वे करून 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना लागू करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र भारतासाठी हा मोठा आणि गौरवाचा दिवस
मानला जातो.
भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली असली तरी आजही देशात आपल्याला गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बँक घोटाळे, झुंड बळी, जातीयवाद, हिंसाचार यांच्याशी आजही आपण लढतोय, ही स्वतंत्र भारतासाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशा गुन्ह्याविरुद्ध सरकारने व राजकीय पुढार्‍यांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. कारण देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, हजारो क्रांतिकारक, मवाळवादी -जहालवादी, थोर महात्मे आदींसह लाखो स्वतंत्र शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हाच 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उदयास आला. भारताच्या थोर महात्म्यांना भारत स्वतंत्र करण्यासाठी दोन नद्यांचा सहारा घ्यावा लागला व त्या दोन नद्यांचा उगम म्हणजे एक मवाळवादी तर दुसरी जहालवादी यांच्या संगमानेच भारतीय स्वातंत्र्यलढा उभा झाला.
याकरिता आपल्याला 15 ऑगस्ट 1947 उजाडण्यासाठी तब्बल 150 वर्षे वाट पाहावी लागली. 150 वर्षांच्या काळातील स्वतंत्र वीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये व त्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आणली. यात मुख्यत्वेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर -महात्म्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु, दु:खाची गोष्ट म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून देशात भ्रष्टाचार, करोडोंचे घोटाळे, बलात्कार, गुन्हेगारी, निवडणुकांमध्ये जातीयवाद याला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याचे पहायला मिळते. ही शहीद वीरांच्याप्रति अत्यंत दु:खद व चिंताजनक बाब आहे. आपल्या पूर्वजांनी व देशाच्या स्वतंत्र संग्राम सेनानींनी आणि बहादूर वीरांनी घरदार, परिवार या संपूर्ण गोष्टी बाजूला सारून व त्याग करून स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व लाखोंच्या संख्येने बलिदान दिले. परंतु, आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल की, आपण भारत स्वतंत्र होऊन 78 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत, तरीही भारतातील भ्रष्टाचार थांबलेला नाही. भारतातील राजकीय पुढार्‍यांजवळ, पुंजीपती व भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांजवळ वाममार्गाने कमवलेली करोडोंची चल-अचल संपत्ती आजही आहे. ही संपत्ती एकत्र केली तर भारताला तब्बल 10 वर्षे कोणाही जवळून कर्ज घ्यावे लागणार नाही व गरिबी आणि महागाई संपुष्टात येऊ शकते आणि देश सुजलाम् – सुफलाम् होण्यास मोठी मदत मिळेल. याकरिता भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढारी ही देशाला लागलेली कीड आहे. ही कीड मुळासकट नष्ट
व्हायला हवी व यावर आळा बसायला हवा.
आज मूठभर राजकीय पुढार्‍यांनी करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती डांबून ठेवल्याने व चलनात नसल्याने देशातील गरीब वर्ग गरिबीच्या खाईत जात आहे तर श्रीमंत वर्ग दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे व देशाच्या विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच देशात महागाई व बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारताचे प्रजासत्ताक दिनाचे 76 व्या वर्षाचे औचित्य साधून देशातील संपूर्ण भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांनी वाममार्गाने कमविलेला पैसा सरकारने आपल्या तिजोरीत जमा करावा. यामुळे देशाचा विकास, बेरोजगारीची समस्या, महागाई यावर आळा घालण्यासाठी मोठी मदत होईल व देशाचा विकास भरभराटीला येईल. याचे स्वागत आपले पूर्वज, शहीद व स्वातंत्र्यसेनानी अवश्य करतील व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला दिलासा अवश्य मिळेल हीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहिदांना खरी आदरांजली ठरेल. देशात वाढते हवामानातील बदल, प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंगचा धोका पाहता, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी. याकरिता शाळा, कॉलेज, संपूर्ण सरकारी क्षेत्र, राजकीय पुढारी, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल व प्रदूषणावर मात करण्यासाठी मोठी मदत मिळेल. आजच्या दिवशी वृक्षलागवड झाली तर ती अनंतकाळापर्यंत सर्वांच्या हृदयात राहील व लाखो शूरवीरांचे दर्शन प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात, फळात व जळामुळात आपल्याला होईल. यामुळे भारतीय शहिदांची व शूरवीरांची गाथा अबाध्य आहे.कारण त्यांच्या आशीर्वादानेच आपण आज मोकळा श्वास घेत आहोत. जय हिंद!

Republic Day means the constitution of independent India

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

8 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

16 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

21 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

27 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

33 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

47 minutes ago