150 सीसीटीव्ही तपासत विनाक्रमांकाच्या रिक्षेचा घेतला शोध
सिडको : प्रतिनिधी
रिक्षात प्रवास करणार्या ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून चोरी केलेले सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकास आणि गुंडाविरोधी पथकास यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी नलिनी धनाजी गोसावी (वय 58, रा. वैशाली रो-हाउस, कालिकानगर, उंटवाडी, सिडको) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 6 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्या निमाणी बसस्थानकावर उतरून रिक्षाने घरी जात होत्या. प्रवासादरम्यान रिक्षातील इसमांनी ‘गॅस संपल्याचा’ बहाणा करून त्यांना रस्त्यात उतरविले. त्यानंतर दुसर्या रिक्षाने त्या घरी गेल्या. घरी पोहोचल्यावर बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अविनाश नडविनकेरी, पोलिस शिपाई समाधान शिंदे आणि उल्हास गांगुर्डे यांनी फिर्यादीच्या घरापासून निमाणी बसस्थानक आणि म्हसरूळ परिसरापर्यंत सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. त्यातून क्रमांक नसलेली रिक्षा आणि संशयित आरोपींची माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे रवींद्र मल्लू घुमडकर (वय 37, रा. आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसर, म्हसरूळ, नाशिक; मूळ रा. वरखेडी, जि. धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने दुसरा आरोपी रमेश बाबूराव जाधव (वय 53, रा. सावित्री सोसायटी, अमृतधाम साईनगर) याचा शोध घेतला. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपींकडून 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार देसले करीत आहेत.
Rickshaw driver arrested for robbing woman’s jewelry