आदिवासी मुली विकणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

मोबाइल, कपड्यांचे आमिष दाखवून बालविवाह

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
तालुक्यातील हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रत्यक्षात दोन लाखांची दलाली घेऊन विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत मुलीची
सुटका केली.
मुलींची विक्री करणार्‍या आंतरजिल्हा टोळीतील 10 संशयितांना जेरबंद केले आहे.
आई नसलेली ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी हरसूल पोलिसांत तक्रार दिली होती. तपासादरम्यान समोर आले की, आरोपींनी संगनमत करून मुलीला मोबाइल आणि नवीन कपड्यांचे आमिष दाखवले. पालकांच्या रखवालीतून पळवून नेत तिचा कौठे मलकापूर (ता. संगमनेर, जि, अहिल्यानगर) येथे तुषार पाटीलबा पचपिंड (वय 29) याच्याशी बालविवाह लावून दिला. या गुन्ह्यात मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. हा विवाह जुळवण्यासाठी आणि मुलीची विक्री करण्यासाठी मध्यस्थांना दोन लाख रुपये रोख व फोन पेद्वारे देण्यात आले होते.
पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपींसह दलाली करणारे आणि मदत करणार्‍या एकूण 10 जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये तुषार पचपिंड, संदीप पचपिंड, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सीता बेंडकोळी, ठकूबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापू पाटोळे, विशाल परचंडे आणि महादेव नाईकवाडे यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिसांनी ही धडक
कामगिरी केली.

आदिवासी भागातील मुलींना आमिष दाखवून पळवणार्‍या या टोळीचा सखोल तपास व्हावा. या दुर्गम भागातून आणखी किती मुलींची अशी विक्री झाली आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी मी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी.
– आमदार हिरामण खोसकर

Inter-district gang selling tribal girls put behind bars.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *