रिक्षाचालकांची मुजोरी वाढली, दिंडोरी नाक्यावरील घटना
पंचवटी : प्रतिनिधी
दिंडोरी रोडवरून राँग साइड व धोकादायक पद्धतीने रिक्षा (एमएच 15-जेए 5472) दामटत आणणार्या रिक्षाचालकाला दिंडोरी नाक्यावर कर्तव्य बजावणार्या पोलिसाने अडवून जाब विचारला. त्यावेळी त्याने व त्याच्या एका दुचाकीस्वार साथीदाराने पोलीस अंमलदार अंबादास तांदळे यांच्यावर हल्ला चढवला. काहीतरी लोखंडी टणक वस्तूने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने तांदळे रक्तबंबाळ झाले. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास घडली.
नाशिक शहर व परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना दुसरीकडे बेशिस्त रिक्षा चालकांकडून पोलिसांवर थेट हल्ले करत मारहाण करण्याच्या घटना एकापाठोपाठ घड्डू लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तांदळे त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार दीपक शिलावट हे दोघेही दिंडोरी नाका येथील स्टॅण्डवर वाहतूक नियंत्रण व व्यवस्थापनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी रिक्षाचालकाने विरुद्ध बाजूने सुसाट रिक्षा चालवत आणली असता त्यांनी त्यास हटकले. याचा राग मनात धरून त्याने व त्याच्या एका दुचाकीस्वार साथीदाराने तांदळे यांच्यावर हल्ला चढविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात पोलिस अंमलदार अंबादास तांदळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. शिलावट यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात दोघा संशयित हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rickshaw puller attacks policeman on duty