नाशिक : प्रतिनिधी
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणच्या युद्धाचा परिणाम भारतातील सर्वसामान्यांच्या जगण्यावर होत असल्याचे चित्र आहे. युद्धाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढल्याचे चित्र आहे. गॅसपाठोपाठ अनेक वस्तूंच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांंचे कंबरडे मोडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांंचे अर्थिक बजेट कोलमडले आहे. एकीकडे महागाई वाढत असताना पगार मात्र स्थिर असल्याने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. अमेरिका-इराणदरम्यान झालेल्या युद्धामुळे गॅसटंचाई निर्माण झाली. त्यानंतर घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. इतकेच नाही, तर सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याने रिक्षाचालकांकडून भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेलिंग महागण्याची शक्यता आहे. परिणामी सातत्याने महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर जगायचे कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, दैनंदिन वापराच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याने महागाईने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र
आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून महागाईबाबत आवाज उठवण्यात येत असला, तरी राजकीय पक्षांकडून अद्याप वाढत्या महागाईबाबत भाष्य केले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मात्र, पगार स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आहे.
– संतोष पाटील, नागरिक
Rising inflation has broken the backs of the common man.