शत्रू देशांना वगळून इराणने हॉर्मझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अमेरिकेपुढे नमते घ्यायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. अमेरिकेने आमच्या वीज प्रकल्पावर हल्ला केला, तर शेजारी देशांत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना वीज पुरविणार्या प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणने दिला आहे. इराणने आपल्या मित्र देशांसाठी सामुद्रधुनी खुली करण्याचे ठरवून अमेरिका, इस्रायल तसेच या दोन्ही देशांना पाठिंबा देणार्या देशांसाठी सामुद्रधुनी बंदच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. सामुद्रधुनी खुली करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विनंतीवजा सूचना अनेक देशांनी धुडकावून लावली. त्यानंतर ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्करी मोहीम सुरू करूनही सामुद्रधुनी खुली झाली नाही. सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर अमेरिका हल्ला करेल. त्याची सुरुवात सर्वांत मोठ्या वीज प्रकल्पापासून होईल आणि आम्ही विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करू, असा नवा इशारा ट्रम्प यांनी दिला. त्यानंतर इराणने शत्रू राष्ट्रे वगळता सर्वांसाठी सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली; परंतु ट्रम्प यांच्या नव्या धमकीला इराणने जशास तसे उत्तर देण्याचा निश्चय केला आहे. वीज प्रकल्पांवर हल्ला केल्यास अमेरिकेच्या लष्करी तळांना ऊर्जा पुरवणार्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात येईल, असे इराणने म्हटले. आखातातील अनेक वाळवंटी देशांमध्ये, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवणार्या प्रकल्पांशी वीज प्रकल्प जोडलेले आहेत. वीज पायाभूत सुविधांवर हल्ला करणे म्हणजे थेट पाणीटंचाईला आमंत्रण देण्यासारखे होईल. “तुम्ही आमच्या रुग्णालयावर हल्ला केला, आम्ही तसे केले नाही; तुम्ही आमच्या मदत केंद्रांवर हल्ला केला, आम्ही तसे केले नाही; तुम्ही आमच्या शाळांवर हल्ला केला, आम्ही तसे केले नाही, पण जर तुम्ही विजेवर हल्ला केला, तर आम्ही विजेवर हल्ला करू,” असे इराणने म्हटले आहे. वीज प्रकल्पांवर हल्ले झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल. सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेऊन इराणने समजूतदारपणा दाखविला, असे म्हणता येत असले, तरी तो देश अमेरिकेच्या दबावाला बळी पडला नाही. उलट अमेरिकेचे ऐकू नका, आम्ही तुमचा मार्ग खुला करत आहेत, पण अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नका, असा एक संदेश इराणने जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन यांसारख्या देशांना दिला आहे. भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी अपेक्षा मित्र म्हणून इराणची असेलच. इराणने भारताची चिंता तूर्त दूर केली आहे. युद्ध भडकल्यानंतर हॉर्मझ सामुद्रधुनी जगभर चर्चेत आली. पर्शियन आखात (इराणचे आखात) आणि ओमानचे आखात यांना जोडणारा एक अरुंद मार्ग म्हणजे हॉर्मझ सामुद्रधुनी. ओमानच्या आखातातूनच पुढे अरबी समुद्र व हिंदी महासागरात जाता येते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे 167 किलोमीटर व रुंदी 55 ते 95 किलोमीटर आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेस इराण, तर दक्षिणेस अरबस्तान द्वीपकल्पावरील हे देश आहेत. दक्षिणेला सामुद्रधुनीला लागून मुसंदम बेट असून, ते ओमानचा भाग आहे. मुसंदम बेट आणि इराण यांदरम्यान सामुद्रधुनीची रुंदी सर्वांत कमी आहे. जगातील मोठमोठ्या तेलवाहू व गॅसवाहू जहाजांच्या वाहतुकीच्या दृष्टीने सामुद्रधुनी खोल असून, सागरी अडथळ्यांपासून मुक्त आहे. मुसंदम बेटाजवळ तिची खोली सर्वाधिक असून, इराणच्या बाजूला ती कमी होत गेलेली आहे. जगातील खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या संभाव्य साठ्यांपैकी अनुक्रमे दोन तृतीयांश आणि एक तृतीयांश साठे पर्शियन आखाताच्या सभोवतालच्या देशांत असून, हे सर्व देश खनिज तेल व नैसर्गिक वायू (गॅस) उत्पादनातही अग्रेसर आहेत. त्यांचा तेलाचा व्यापार पर्शियन आखातातून पुढे याच हॉर्मझ सामुद्रधुनीमार्गे जगभरातील देशांशी चालतो. त्यामुळे जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी हा एक असून, औद्योगिकदृष्ट्या विकसित व विकसनशील देशांच्या दृष्टीने हा मार्ग आणि त्यास भोवतालचा प्रदेश अतिशय महत्त्वपूर्ण बनला आहे. येथील उत्पादित खनिज तेलाचे त्याच प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे शुद्ध तेलाची, तसेच कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात प्रामुख्याने वायव्य युरोपीय देश, संयुक्त संस्थाने, पूर्व आशियातील देश आणि जगातील इतर अनेक देशांना केली जाते. त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या मोठमोठ्या तेलवाहू, तसेच इतर मालवाहू व्यापारी जहाजांची निरंतर वाहतूक या सामुद्रधुनीतून चालू असते. ओपेकच्या (पेट्रोलियम उत्पादन व निर्यात करणार्या देशांची संघटना) सदस्य देशांपैकी पर्शियन आखातालगत असलेले सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि इराक हे देश तेलाची निर्यात याच सामुद्रधुनीमार्गे करतात. हॉर्मझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वांत महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी मार्गांपैकी एक मार्ग आहे. हॉर्मझ सामुद्रधुनी हा पर्शियन आखात ओमानच्या आखाताला तसेच पुढे अरबी समुद्र व हिंदी महासागराला जोडणारा एकमेव सागरी मार्ग आहे. जगाच्या गरजेपैकी सुमारे 20 टक्के खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्यात केवळ या सामुद्रधुनीमार्गे होते. भारताला मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस यात सामुद्रधुनीतून होत असतो. एकूण आखातातील एकूण इंधन निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के निर्यात आशियातील देशांना प्रामुख्याने चीन, भारत, जपान व दक्षिण कोरियाला होत असते. इराणचे आर्थिक व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले अब्बास बंदर या सामुद्रधुनीच्या उत्तर किनार्यावर आहे. तेथून जवळच इराणची बेटे आहेत. हॉर्मझ सामुद्रधुनीतील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तीन किलोमीटर रुंदीची जहाजांची मार्गिका (शिपिंग चॅनेल) आखून देण्यात आली आहे. त्या मार्गिकेवरूनच वाहतूक केली जाते. या मार्गिकेच्या बाजूने तीन किलोमीटर रुंदीचे निर्बंधित विभाग आहेत. संयुक्त राष्ट्राच्या नियमानुसार देशांना त्यांच्या किनार्यापासून 12 नॉटिकल मैल (22.2 किलोमीटर) अंतरापर्यंत ताबा ठेवता येतो. म्हणजे सर्वांत चिंचोळ्या ठिकाणी ही सामुद्रधुनी व त्यातील जहाजांची मार्गिका या पूर्णपणे इराण व ओमानच्या ताब्यातील जलभागात येतात. सामुद्रधुनीतील सर्वाधिक जलमार्ग ओमानच्या प्रादेशिक जलहद्दीतून व काही मार्ग इराणच्या प्रादेशिक जलहद्दीतून जात असला, तरी त्याचे नियमन आंतरराष्ट्रीय सागर विधी व संयुक्त राष्ट्रांच्या सागरविषयक कायद्यातील संकेतानुसार केले जाते. सामुद्रधुनीतील उत्तरेकडील सागर मार्गाचे नियंत्रण इराण करतो, तर दक्षिणेकडील मार्गाचे नियंत्रण ओमान करतो. जून 2025 मध्ये इस्रायल-इराण युद्धात इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे इराणच्या संसदेने हॉर्मझ सामुद्रधुनी मार्ग वाहतुकीसाठी बंद करून नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांंत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले. यानंतर इराणने हॉर्मझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. या सामुद्रधुनीतून जाणार्या जहाजांना आग लावण्याचा इशाराही इराणने दिला. तेव्हापासून जगभरात खनिज तेल व गॅसच्या किमती भडकल्या. इंधनाची टंचाई निर्माण झाली. भारतालाही त्याची मोठी झळ बसली.
A comforting decision