वर्दळीच्या रस्त्यातून धोकादायक वाहतूक

प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : प्रतिनिधी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे एकीकडे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना व शहरातील रस्त्यांवरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले असतानाच , भर वर्दळीतून लोखंडी सळया , बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलची धोकादायक वाहतूक केली जात असल्याने यातून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे . मालवाहू टेम्पोतून लोखंडी सळया , लोखंडी पत्रे , बांधकामासाठी लागणारे स्टील आदींची वाहतूक केली जाते . हे साहित्य टेम्पो अथवा छोटा हत्ती , पिकअपमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाते . विशेष म्हणजे या लोखंडी सळया टेम्पोच्या बाहेर लोंबकळत असतात . अशा प्रकारचे साहित्य वाहतूक करावयाचे असल्यास त्यावर लाल कापड अथवा ते बंदिस्त वाहनातून नेणे बंधनकारक असताना टेम्पोचालक सर्रासपणे भरवस्तीतून लोखंडी सळया घेऊन जाताना त्यावर लाल कापड लावण्याऐवजी बारदान , कोणत्याही रंगाचे कापड लावतात . या वाहनाच्या मागे असलेल्या दुचाकीस्वार अथवा इतर वाहनधारक धडकल्यास यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *