नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळून लावत तीन संशयितांना जेरबंद केले. यापैकी एकाची कसून चौकशी केल्यानंतर जेलरोड परिसरातील वृद्ध महिलेच्या घरात घुसून केलेल्या जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक 8 जुलै रोजी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी डायल 112 वरून सिन्नरफाटा येथील सिटीलिंक बसडेपो परिसरात काही संशयित लपून बसल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढला. मात्र, पाठलाग करून साहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देवीदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत दोरी, मिरची पूड, लोखंडी करवत व कटवणी असे दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांचे दोन साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
पोलीस कोठडीत आरोपी रामदास सूर्यवंशी याची चौकशी केली असता, त्याने साथीदार करण घुगे याच्यासह 7 जुलै रोजी जेलरोड पाण्याच्या टाकीजवळील एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्याचे कानातील टॉप्स आणि मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा यापूर्वीच दाखल असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे तसेच सीआर मोबाइलचे पोलीस शिपाई अर्जुन गिते आणि मंगेश बोडके यांनी यशस्वीपणे
पार पाडली.
Robbery plot foiled during patrol; three arrested.