आरटीओ कर्मचार्‍यांचा संप स्थगित

परिवहनमंत्री सरनाईक यांच्यासोबतची चर्चा यशस्वी

पंचवटी : प्रतिनिधी
मोटर वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून संपावर गेले होते. संपावर तोडगा काढण्यासाठी मंगळवार (दि. 23) रोजी राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना पदाधिकारी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा होऊन सरकार आणि प्रशासन यांनी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत आस्था दर्शवली.
पुढील काही दिवसांत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. पदोन्नतीबाबत झटपट निर्णय होणार आहे. उर्वरित प्रतिनियुक्ती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, पदनाम बदल वगैरे मागण्यांबाबत शीघ्रगतीने कार्यवाही केली जाईल याबाबत परिवहनमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाला काही अवधी देण्याबाबत यावेळी सर्व कर्मचार्‍यांचे एकमत झाले. त्यामुळे गेले आठ दिवस सुरू असलेला बेमुदत संप बुधवार (दि. 24 जून 2026)पासून स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मोटर वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली.
मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी संघटना प्रतिनिधींना मंत्रालयातील परिवहनमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी मंत्री व परिवहन विभागाचे उच्च अधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचे नेतृत्व केले. प्रशासनाने पदोन्नती, प्रतिनियुक्ती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना यासारख्या त्यांच्या अधिकार कक्षेत असणा-या प्रश्नांबाबतसुद्धा कसे नकारात्मक धोरण अवलंबिले जाते याबाबतचा तपशील त्यांनी मंत्री सरनाईक यांच्या समोर पुराव्यासह मांडला. परिवहन विभागाच्या प्रशासनाची कार्यपद्धती प्रचलित नियमांनादेखील बगल देऊन कर्मचार्‍यांना सेवाविषयक लाभांपासून वंचित ठेवले गेले याबाबत माहिती दिली. ना. सरनाईक यांनी अत्यंत गंभीरपणे सुनावणी देऊन परिवहन आयुक्तांच्या अधिकार कक्षेत येणारा पदोन्नतीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लागेल, इतर प्रश्नांबाबत येत्या 15 दिवसांत कर्मचारीभिमुख निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले. येत्या 15 दिवसांत आयुक्त स्तरावर चर्चा करून इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
संघटनेसह झालेल्या या चर्चेच्या अनुषंगाने मान्य झालेल्या ठरावांची घोषणा दि. 24 जून रोजी विधानसभा अधिवेशनात केली जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळेे आठ दिवस सुरू असलेला बेमुदत संप दि. 24 जूनपासून स्थगित करण्याचा निर्णय सरचिटणीस सरतापे यांनी घोषित केला. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी संपात सहभागी झालेल्या परिवहन कर्मचार्‍यांचे आभार मानले.

आजपासून आरटीओचे कामकाज सुरळीत

मोटर वाहन विभाग (आरटीओ) कर्मचार्‍यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवार, दि.16 पासून संप पुकारला होता. याबाबत वरिष्ठ पातळीवर यशस्वी चर्चा झाली. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या माहितीनुसार आज, बुधवार, दि. 24 जूनपासून संप स्थगित केला आहे. त्यामुळे आजपासून आरटीओ कार्यालयांतील कामकाज सुरळीत होणार आहे.
– ज्ञानेश्वर करंजकर, अध्यक्ष,मोेटार वाहन विभाग (आरटीओ)

 

RTO employees’ strike called off.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *