जिल्ह्यात 526 गावे-वाड्यांना पाणीपुरवठा
2.35 लाख नागरिकांची तहान 129 टँकरवर; नांदगाव, येवला, मालेगावमध्ये सर्वाधिक टंचाई
नाशिक : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन जुलैचा मध्य उलटला असला तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासनाला अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 16 जुलैच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 121 गावे आणि 405 वाड्या, अशा एकूण 526 ठिकाणी 129 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, 2 लाख 35 हजार 701 नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे.
जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 42 गावे व 208 वाड्यांसाठी 42 टँकर सुरू आहेत. येवला तालुक्यात 95 गावे-वाड्यांसाठी 39 टँकर, मालेगावमध्ये 64 ठिकाणी 16 टँकर, सिन्नरमध्ये 75 ठिकाणी 12 टँकर, देवळ्यात 18 ठिकाणी 7 टँकर, चांदवडमध्ये 16 ठिकाणी 8 टँकर आणि बागलाणमध्ये 8 ठिकाणी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड तालुक्यांमध्ये सध्या टँकरची गरज नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अद्याप अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरी व स्थानिक जलस्रोत पुरेसे भरलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या मध्यातही शेकडो गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
टँकरची सद्यस्थिती
टँकरग्रस्त गावे : 121
टँकरग्रस्त वाड्या : 405
एकूण गावे-वाड्या : 526
एकूण टँकर : 129
लाभार्थी लोकसंख्या : 2,35,701
सर्वाधिक टंचाई
नांदगाव : 42 टँकर
येवला : 39 टँकर
मालेगाव :16 टँकर
Rural areas still dependent on tankers even in mid-July.